प्राचार्य नाना शिवले यांचा दिशा फाऊंडेशनकडून सत्कार


पिंपरी: (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) –
दिशा सोशल फाऊंडेशनचे ज्येष्ठ संचालक तसेच माजी अध्यक्ष जगन्नाथ उर्फ नाना शिवले यांची थेरगाव येथील प्रेरणा माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय या शिक्षण संस्थेत प्राचार्यपदी नियुक्ती झाली आहे. यानिमित्ताने मंगळवारी (१५ जुलै) दिशा सोशल फाऊंडेशन परिवाराच्या वतीने त्यांचा शिवप्रतिमा, स्मृतीचिन्ह देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.
दिशा सोशल फाऊंडेशनच्या स्थापनेपासूनच कार्यरत असलेले नाना शिवले हे शहरातील विविध सामाजिक, सांस्कृतिक, सहकारी संस्थाशी संबंधित आहेत.
पिंपरी चिंचवड शहरातील प्रसिध्द सूत्रसंचालक, वक्ते व मुलाखतकार म्हणूनही ते सर्वपरिचित आहेत. महापालिकेच्या शिक्षण मंडळावर सदस्य आणि उपसभापती म्हणून काम करण्याची त्यांना संधी मिळाली, तेव्हा त्यांनी विविध नाविण्यपूर्ण उपक्रम राबवत त्या संधीचे सोने केले.
नाना शिवले यांचे शिक्षण बी. कॉम., एम. ए., एम. जे., एम. एड., एम. फिल. असून सध्या ते `मराठी कादंबरीतील प्रयोगशीलता : एक चिकित्सक अभ्यास’ या विषयावर पी. एच. डी करत आहेत.
पुणे जिल्हा मराठी अध्यापक संघाच्या माध्यमातून त्यांचे मराठी भाषेसंबंधी कार्य सुरूच आहे. प्राचार्यपदी नियुक्ती होणे त्यांच्या आतापर्यंतच्या अथक परिश्रमाचे फलित आहे. हेच औचित्य साधून झालेल्या या सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने त्यांच्या एकूणच कार्याचा आढावा घेण्यात आला.
दिशा सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष बाळासाहेब जवळकर, माजी अध्यक्ष गोरख भालेकर, उपाध्यक्ष संतोष बाबर, कार्याध्यक्ष राजेंद्र करपे यांच्यासह इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते
. सत्काराला उत्तर देताना प्राचार्य शिवले यांनी त्यांचा आतापर्यंतचा प्रवास विशद केला. ते म्हणाले, माझ्या नोकरीची सुरुवात गरवारे वॉल रोप या कंपनीत ट्रेनी ऑपरेटर म्हणून झाली. तेव्हा वाल्हेकरवाडीत मी ८ वी ते १० वीचे मोफत क्लास घेत होतो
. पदवी परीक्षेवेळी सुट्टी न मिळाल्यामुळे मी सदर नोकरी सोडली. तेव्हा प्रेरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तुकाराम गुजर आणि कांतीलाल गुजर यांनी मला क्लार्क म्हणून नोकरीची संधी दिली.
शिक्षण सुरूच होते. बी. एड. झाल्यानंतर या संस्थेत शिक्षक आणि आता प्राचार्य पदावर काम करण्याची संधी मिळाली आहे. आपल्यावर दाखवण्यात आलेला विश्वास आपण नक्कीच सार्थ ठरवू. आपण प्रामाणिक राहिलो, सातत्यपूर्ण कष्ट करत राहिलो तर नक्कीच उत्तमातील उत्तम संधी आपल्याला मिळू शकते.