शहर परिसरात वन, पोलीस आणि महसूल विभागाकडून देखरेख ठेवली जाणार – वनमंत्री गणेश नाईक

पुणे : (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) शहर परिसरातील टेकड्यांवर रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत ठेकेदार बांधकामाचा राडारोडा टाकत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. या राडारोड्यामुळे टेकड्यांचा परिसर विद्रुप होत असून टेकडीचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये शहराचा विस्तार चारही दिशांना मोठ्या प्रमाणात होत चालला असून बांधकामे देखील वेगाने होत आहे.बांधकामांमधून तयार होणारा राडारोडा बेकायदेशीरपणे टेकड्यांवर टाकला जात असून त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप आमदार शिरोळे यांनी केला. वन अधिकाऱ्यांकडून राज्य सरकारने याचा सविस्तर अहवाल मागवावा, अशी मागणी त्यांनी केली.शहरातील टेकड्यांवर सर्रासपणे बांधकामांचा राडारोडा टाकून टेकड्या विद्रुप करण्याचे प्रकार सुरू आहेत. टेकड्यांवर ठेकेदारांमार्फत राडारोडा आणि कचरा टाकण्यात येत असून, याबाबतचा अहवाल वन अधिकाऱ्यांकडून मागवावा, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी सोमवारी विधिमंडळात केली. शहर परिसरात वन, पोलीस आणि महसूल विभागाकडून देखरेख ठेवली जाणार असल्याची ग्वाही वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली.आमदार शिरोळे यांच्या मागणीला वनमंत्री गणेश नाईक यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. ‘वन खात्याकडून टेकड्यांवरची माती काढून दिली जाणार नाही. मोठमोठ्या शहरांमधून जुने बांधकाम पाडल्यावर राडारोडा टाकण्याचे काम टेकड्या आणि इतरत्र होत आहे. या राडारोड्याची विल्हेवाट लावण्यासाठी राडारोडा विल्हेवाट यंत्रणा उभी करण्याचे काम चालू आहे. शहर परिसरात वन, पोलीस आणि महसूल विभागाकडून देखरेख ठेवली जाणार आहे. तसेच सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. राडारोडा वन विभागाच्या जमिनीवर तसेच अन्यत्र टाकू दिला जाणार नाही.’ असे आश्वसन नाईक यांनी सांगितले.