गणेशोत्सवात पोलिसांकडून कोणतेही निर्बंध लावले जाणार नाही:पोलीस आयुक्त अमितेश कुमार

ps-logo-rgb-14

पुणे: (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)

पुणे शहरातील नागरिक आणि गणेश मंडळांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. यंदाच्या गणेशोत्सवात पुणे पोलिसांकडून कोणतेही एकतर्फी निर्बंध लावले जाणार नसल्याचं आश्वासन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलं आहे. त्यामुळे पुणेकरांना उत्सवाच्या तयारीसाठी अधिक स्वातंत्र्य मिळणार आहे.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ रविवारी पार पडला.

या स्पर्धेत एकूण 194 मंडळे आणि शाळांनी सहभाग घेतला होता. यापैकी 106 मंडळांना पारितोषिकं प्रदान करण्यात आली असून एकूण 14 लाख 95 हजार रुपयांची बक्षीस रक्कम वाटण्यात आली.

या स्पर्धेत भवानी पेठेतील शिवाजी मित्र मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर श्री शनी मारुती बाल गणेश मंडळ (एरंडवणे) आणि पोटसुळ्या मारुती मंडळ (नाना पेठ) यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवला.

कार्यक्रमाचं सूत्रसंचालन महेश सूर्यवंशी यांनी केलं.कार्यक्रमात अण्णा थोरात यांनी यंदाच्या अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी ग्रहण असल्याकडे लक्ष वेधलं. त्यामुळे विसर्जन मिरवणूक सकाळी 8.30 वाजता सुरू करून दुपारी 12 वाजेपर्यंत संपवावी, अशी सूचना त्यांनी केली.

या निर्णयामुळे धार्मिक आणि खगोलशास्त्रीय घटकांचा योग्य समन्वय राखण्यात येणार आहे.

गेल्या वर्षी जे गणेश मंडळांना परवाने मिळाले होते, ते यंदाही वैध मानले जातील. त्यामुळे नव्याने स्वतंत्र पोलीस परवानगी घेण्याची गरज भासणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. या निर्णयामुळे गणेश मंडळांचे नियोजन अधिक सुलभ होणार असून, उत्सव शांततेत पार पडेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे

.याचवेळी, माजी आमदार उल्हास पवार यांनी सांस्कृतिक गणेशोत्सवाचे महत्त्व अधोरेखित करत सांगितले की, आज डीजे आणि मोठा आवाज यालाच महत्त्व दिलं जातं; मात्र उत्सवाचं खरी संकल्पना लोकजागृती आणि सामाजिक ऐक्य आहे.

या कार्यक्रमात डॉ. चेतनानंद महाराज, माजी महापौर अंकुश काकडे, अण्णा थोरात, श्रीकांत शेटे, ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उपाध्यक्ष माणिक चव्हाण, आमदार हेमंत रासने, अक्षय गोडसे, प्रकाश चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलं की, यंदाचा पोलीस बंदोबस्त अधिक नियोजित, सुटसुटीत आणि नागरिकाभिमुख असेल. वाहतूक व्यवस्थेसाठी स्वतंत्र नियोजन करण्यात येणार असून, पुणेकरांची गैरसोय होणार नाही याची खबरदारी घेण्यात येणार आहे.

Latest News