ससून हल्ला प्रकरणातील महत्त्वाचा दुवा पोलिसांच्या हाती…

पुणे : (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) बंडगार्डन पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि तपासात एकूण 11 आरोपींची नावं निष्पन्न झाली होती. या गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी आरोपींवर ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई केली होती. यातील बहुतांश आरोपी गजाआड झाले होते, मात्र रोहित ऊर्फ तम्मा भोसले हा पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला होता.गेली तीन वर्षे तो सतत ठिकाणं बदलत पोलिसांना चकवा देत होता. मात्र, अखेर पुणे पोलिसांनी तम्मा भोसलेच्या मुसक्या आवळाल्या आहेत. गुन्हे शाखेच्या पथकाला तम्मा भोसले याच्याबद्दल गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून त्याला शिताफीने अटक केली. या कारवाईमुळे ससून हल्ला प्रकरणातील महत्त्वाचा दुवा पोलिसांच्या हाती लागला असून, संघटित गुन्हेगारीवर हा मोठा प्रहार मानला जात आहे.शहरात वाढत्या गुन्हेगारी आणि टोळीयुद्धाला लगाम घालण्यासाठी पुणे पोलीस सध्या ‘ॲक्शन मोड’वर आले आहेत. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली संघटित गुन्हेगारीच्या मुसक्या आवळण्यासाठी ‘मोक्का’ आणि तडीपारीची हत्यारं उपसली जात आहेत. याच कारवाईचा भाग म्हणून, तीन वर्षांपूर्वी ससून रुग्णालयाच्या आवारात गोळीबार आणि कोयत्याने हल्ला करत धुमाकूळ घालून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीतील एका कुख्यात फरारी आरोपीला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलं आहे.ससून रुग्णालयाच्या आवारात गोळीबार आणि कोयत्याने हल्ला करत धुमाकूळ… 2022 मध्ये ससून रुग्णालयाच्या आवारात एका थरारक हल्ल्याची घटना घडली होती. आरोपींनी केवळ कोयतेच उपसले नाहीत, तर पिस्तुल काढून गोळीबारही केला होता. यावेळी हंबीरच्या संरक्षणासाठी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर आणि त्याच्या मेहुण्यावरही वार करण्यात आले होते.कुख्यात गुंड तुषार हंबीर याला कारागृहातून उपचारासाठी ससूनमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी संधी साधून पाच हल्लेखोरांनी त्याच्यावर जीवघेणा हल्ला चढवला होता.
