पिंपरी चिंचवड महानगरपालिका आठ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करणार

voter list yadi

पिंपरी चिंचवड : (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना)

महापालिका कार्यक्षेत्रात एकूण मतदारांची संख्या सुमारे १७ लाख १३ हजार ८९१ इतकी आहे. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या ९ लाख ५ हजार ७२८ तर स्त्री मतदारांची संख्या ८ लाख ७ हजार ९६६ इतकी आहे. तर इतर मतदारांची संख्या १९७ इतकी आहे. निवडणुकीसाठी २ हजार ४४ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. निवडणुकीसाठी ८ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आलेल्या महापालिका सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमानुसार नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी २३ डिसेंबर २०२५ ते ३० डिसेंबर २०२५ पर्यंत कालावधी देण्यात आला असून पारंपरिक (ऑफलाईन) स्वरूपात नामनिर्देशन पत्र स्वीकारले जाणार आहे.

प्राप्त नामनिर्देशन पत्रांची छाननी ३१ डिसेंबर २०२५ रोजी होणार असून उमेदवारी माघारीसाठी २ जानेवारी २०२६ ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवारांची यादी ३ जानेवारी २०२६ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे

. महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीसाठी ईव्हीएमचा वापर केला जाणार आहे.

अंतिम मतदार यादी जाहीर झाल्याने आता राजकीय हालचालींना वेग आला आहे. प्रत्येक प्रभागातील मतदारसंख्या लक्षात घेऊन पक्षांकडून रणनीती आखली जात असून, स्थानिक प्रश्न, नागरी सुविधा आणि विकासकामे हे प्रचाराचे केंद्रबिंदू ठरण्याची शक्यता आहे. वाढलेल्या मतदारसंख्येमुळे यंदाची महानगरपालिका निवडणूक

अधिक निर्णायक आणि उत्सुकतेची ठरणार आहे.पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठीची अंतिम मतदार यादी जाहीर झाली असून, शहरातील ३२ प्रभागांमध्ये एकूण १७ लाख १३ हजार ८९१ मतदार नोंदले गेले आहेत. यामध्ये ९ लाख ५७ हजार ७२८ पुरुष, ८ लाख ७ हजार ९६६ महिला, तर १९७ इतर मतदारांचा समावेश आहे. वाढती मतदारसंख्या लक्षात घेता आगामी निवडणुकीत चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे

. प्रभागनिहाय आकडेवारी पाहता प्रभाग क्रमांक १६ मध्ये सर्वाधिक ७५ हजार १०५ मतदार असून, तो शहरातील सर्वात मोठा प्रभाग ठरला आहे. यानंतर प्रभाग क्रमांक ३ (७२ हजार १०६) आणि प्रभाग क्रमांक २ (६९ हजार ५१८) या प्रभागांतही मोठ्या प्रमाणावर मतदार आहेत

. दुसरीकडे प्रभाग क्रमांक २३ मध्ये सर्वात कमी ३३ हजार ३३ मतदार नोंदले गेले आहेत.महिला मतदारांची संख्या अनेक प्रभागांमध्ये लक्षणीय असल्याचे चित्र आहे. काही प्रभागांत महिला मतदारांचे प्रमाण पुरुषांच्या जवळपास पोहोचले असून, याचा थेट परिणाम उमेदवारांच्या प्रचारावर आणि मुद्द्यांच्या निवडीवर होणार आहे. तसेच इतर (तृतीयपंथी) मतदारांची नोंदही जवळपास सर्व प्रभागांमध्ये असल्याने समावेशक लोकशाहीचे चित्र दिसून येत आहे. निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांची ठिकाणे देखील निश्चित करण्यात आली आहेत. यामध्ये स्थानिक संस्था कर कार्यालय, हेडगेवार भवन, प्राधिकरण, निगडी, पुणे

येथे प्रभाग क्रमांक १०, १४, १५ व १९ करिता निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय स्थापित करण्यात आले आहे. प्रभाग क्रमांक १६, १७, १८ व २२ करिता ब क्षेत्रीय कार्यालय, लिंक रोड, एल्प्रो मॉलच्या मागे, चिंचवडगाव येथे निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय असणार आहे.

प्रभाग क्रमांक २, ६, ८ व ९ करिता क क्षेत्रीय कार्यालय, पॉलिग्रास हॉकी स्टेडियमजवळ, एमआयडीसी, भोसरी येथे तर प्रभाग क्रमांक २५, २६, २८ व २९ करिता ड क्षेत्रीय कार्यालय, औंध–रावेत बीआरटी रोड, रहाटणे येथे निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय असणार आहे

. प्रभाग क्रमांक ३, ४, ५ व ७ करिता कबड्डी प्रशिक्षण संकुल, अंकुशराव लांडगे नाट्यगृहाच्या मागे, भोसरी येथे तर प्रभाग क्रमांक १, ११, १२ व १३ करिता सेक्टर १७/१९, स्पाईन रोड शेजारी, घरकुल चिखली टाउन हॉल येथे व प्रभाग क्रमांक २१, २३, २४ व २७ साठी ग क्षेत्रीय कार्यालय, वेंगसरकर अकादमीच्या मागे, थेरगाव येथे आणि प्रभाग क्रमांक २०, ३०, ३१ व ३२ करिता पिंपरी चिंचवड बॅडमिंटन हॉल, पी.डब्ल्यू.डी. मैदान, सांगवी येथे निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय स्थापित करण्यात आले आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी बहुसदस्यीय पद्धतीने निवडणूक राबवली जाणार असून चार सदस्यीय प्रभागरचना असणार आहे.

एकूण ३२ प्रभागांमधून १२८ जागांसाठीची निवडणूक आहे. प्रत्येक उमेदवारासाठी १३ लाख रुपये इतकी खर्चाची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. प्रत्येक मतदाराला ४ मते देण्याचा अधिकार असणार आहे.

Latest News