पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून घंटागाडीत विलगीकरण करून कचरा देण्याचे नागरिकांना आवाहन

पिंपरी, दि. १९ डिसेंबर २०२५ : (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना)पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून घनकचरा व्यवस्थापनाबाबत विविध उपक्रम राबवले जात असून नागरिकांमध्ये कचरा विलगीकरणाबाबत जनजागृती केली जात आहे. नागरिकांनी कचरा संकलनासाठी आलेल्या महापालिकेच्या घंटागाडीत कचरा विलगीकरण करून द्यावा, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
घनकचरा व्यवस्थापन अधिनियम २०१६ नुसार घरगुती तसेच व्यावसायिक कचऱ्याचे विलगीकरण करून देणे बंधनकारक आहे. त्यानुसार नागरिकांनी ओला कचरा, सुका कचरा, घरगुती घातक कचरा, सॅनिटरी कचरा, ई-कचरा असे विविध कचऱ्याचे प्रकार असून त्यानुसार कचऱ्याचे विलगीकरण करून द्यावे, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
योग्य पद्धतीने विलगीकरण झाल्यास पुढील टप्प्यांमध्ये कंपोस्टिंग व पुनर्वापर प्रक्रिया सुलभ होते, अशी माहिती देण्यात आली. आरोग्य विभागाकडून कचरा संकलनावेळी तपासणीसाठी निरीक्षण पथके कार्यरत असून नियमांचे पालन न झाल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
…..
कचऱ्याचे प्रकार
ओला कचरा : भाजीपाल्याच्या साली, अन्नाचे उरलेले तुकडे, फुलांचा कचरा, बागेतील पाने व अन्य जैविक कचरा.
सुका कचरा : प्लास्टिक, कागद, धातू, बाटल्या, पॅकेजिंग साहित्य, थर्माकोल तसेच इतर पुनर्वापरयोग्य वस्तू.
घरगुती घातक कचरा : ट्यूबलाईट, बॅटरी, बल्ब, तुटलेल्या धारदार वस्तू, रसायने, इंजेक्शन व जैववैद्यकीय कचरा.
सॅनिटरी कचरा : सॅनिटरी पॅड्स, डायपर्स, बँडेजेस.
ई-कचरा : बिघडलेले संगणक, लॅपटॉप, सीपीयू, दूरदर्शन संच तसेच इतर इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक उपकरणे.
………….
