प्रभाग 14 मध्ये उमेदवारी नाकारल्याने अपक्ष लढण्याचा निर्णय

राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नगरसेवक जावेद शेख यांचा सुपुत्र तौहीद शेख यांचे अजितदादा पवारांवर आरोप
पिंपपरी । चिंचवड (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जावेद शेख यांनी नगरसेवक पदाच्या तीन टर्ममध्ये केलेल्या कार्याची कदर पक्षाने केली नाही. पक्षाने त्यांच्या कुटुंबातील एकाही सदस्याला पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत उमेदवारी दिली नाही. केवळ जातीमुळे उमेदवार नाकारण्यात आली आहे. तसेच, शहरातील सर्व 32 प्रभागात एकाही अल्पसंख्याक उमेदवार देण्यात आलेला नाही. उमेदवारी नाकारल्याने चिंचवड स्टेशन, मोहननगर, रामनगर, काळभोरनगर, दत्तवाडी प्रभाग 14 मध्ये अपक्ष म्हणून “पुस्तक” या चिन्हावर मी निवडणूक लढत आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक जावेद शेख यांचे सुपुत्र तौहीद शेख यांनी स्पष्ट केले आहे.
आकुर्डी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली. प्रभाग क्रमांक 14 येथून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असलेले तोहीद शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अजितदादा पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
तोहीद शेख म्हणाले की, प्रभाग 14 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने एकाच घरातील दोन व्यक्तींना उमेदवारी दिली. ही बाब अत्यंत दुर्दैवी आणि कार्यकर्त्यांना नाराजी निर्माण करणारी आहे. आमच्या कुटुंबाचा या प्रभागात मोठा राजकीय व सामाजिक वारसा आहे. माझे वडील दिवगंत जावेद शेख हे गेली पंधरा वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक होते. त्यांनी प्रभागासाठी प्रामाणिकपणे काम केले. त्या पार्श्वभूमीवर आम्हालाही किमान एक उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा होती.
ते पुढे म्हणाले की, या निवडणुकीसाठी आमच्या कुटुंबाकडून आई आणि मी असे दोन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यापैकी किमान एक तरी तिकीट दिले जावे, ही आमची रास्त मागणी होती. मात्र, पक्षाने आमच्या अपेक्षांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. शहरभरात एकाही उमेदवाराला अल्पसंख्याक समाजातून तिकीट न देण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी पक्षाच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
ही उमेदवारी जातीच्या आधारावर कापण्यात आली, असा थेट आरोप करत तोहीद शेख म्हणाले, मी माजी नगरसेवक दिवंगत जावेद शेख यांचा मुलगा आहे. आमच्या कामाचा, आमच्या योगदानाचा विचार न करता केवळ जात आणि समाज पाहून निर्णय घेण्यात आला. हे केवळ माझ्यावर नव्हे, तर संपूर्ण अल्पसंख्याक समाजावर अन्याय करणारे आहे.
या अन्यायकारक निर्णयामुळेच आपण अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलो असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पक्षाच्या निर्णयामुळे खचून न जाता, जनतेच्या पाठबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. ही लढाई माझ्या वैयक्तिक राजकारणासाठी नाही, तर प्रभागातील नागरिकांच्या हक्कांसाठी आणि स्वाभिमानासाठी आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
……
वयाच्या 24व्या वर्षी सार्वजनिक जीवनात ठाम पाऊल – तोहीद शेख
पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक दिवंगत जावेद शेख यांचे पुत्र असलेल्या तोहीद शेख यांनी वयाच्या अवघ्या 24व्या वर्षी सार्वजनिक जीवनात उतरण्यामागील भूमिका स्पष्ट करत उपस्थित माध्यमांशी मनमोकळा संवाद साधला.
सार्वजनिक जीवनात उतरण्याचा आत्मविश्वास मला लोकांमधूनच मिळाला, असे सांगत तोहीद शेख म्हणाले की, हानपणापासून परिसरातील समस्या, नागरिकांचे प्रश्न आणि त्यासाठी चालणारा संघर्ष जवळून पाहिला. फक्त पाहणारा न राहता काहीतरी बदल घडवायचा हा विचारच माझा आत्मविश्वास आहे.
दिवंगत जावेद शेख यांच्या राजकीय वारशाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, वडिलांनी प्रामाणिकपणा, सर्वसामान्यांशी थेट संवाद आणि दबावाला न झुकता काम करण्याची शिकवण दिली. हीच मूल्ये आजच्या काळानुसार पारदर्शकता, जबाबदारी आणि तरुणांच्या सहभागासह पुढे नेण्याचा माझा प्रयत्न आहे. वडिलांच्या नावावर राजकारण न करता स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
आजच्या तरुणांवर असलेल्या मानसिक दबावाविषयी प्रश्न विचारला असता तोहीद शेख म्हणाले की दबाव येतो, टीका होते; पण भावनिक प्रतिक्रिया देण्यापेक्षा संयम ठेवणे गरजेचे आहे. प्रत्येक अडचण ही शिकवण असते, हे मी स्वतःला सतत आठवण करून देतो. कोणत्याही पक्षाशी तात्काळ न जोडता अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्यामागचे कारण स्पष्ट करताना ते म्हणाले, मला थेट जनतेशी जोडलेले राहायचे आहे. पक्षीय चौकटीपेक्षा नागरिकांचा विश्वास मला अधिक महत्त्वाचा वाटतो. निवडणुकीचा निकाल काहीही असो, पुढील सार्वजनिक भूमिकेबाबत ते ठामपणे म्हणाले, ही निवडणूक शेवट नाही, तर सुरुवात आहे. निवडून आलो किंवा नाही आलो, तरी समाजकार्य, युवकांसाठी उपक्रम आणि प्रभागातील प्रश्नांवर माझा संघर्ष सुरूच राहील.
आजच्या तरुण नेत्यांनी कशा प्रकारचे राजकारण करावे, यावर ते म्हणाले, नकारात्मकतेऐवजी विकास, शिक्षण, रोजगार आणि मूलभूत सुविधांवर आधारित राजकारण ही काळाची गरज आहे.
मतदारांकडून मिळणार्या प्रतिसादाबाबत समाधान व्यक्त करताना तोहीद शेख म्हणाले की, घरोघरी भेटीतून नागरिकांचा थेट संवाद मिळतो आहे. पाणी, रस्ते, स्वच्छता, आरोग्य आणि युवकांसाठी संधी या मुद्द्यांवर लोक अपेक्षा व्यक्त करत आहेत आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्याची संधी मला द्यावी, अशी भावना दिसते. आव्हानात्मक काळात स्वतःला स्थिर ठेवणारी गोष्ट कोणती, यावर त्यांनी कुटुंबाचा पाठिंबा, कार्यकर्त्यांची साथ आणि नागरिकांचा विश्वास हेच आपले बळ असल्याचे सांगितले.
शेवटी मतदारांना संदेश देताना तोहीद शेख म्हणाले, ही निवडणूक व्यक्तीपेक्षा विचारांची आहे. पुस्तक या चिन्हावर मतदान करून शिक्षण, समज आणि विकासाला संधी द्या. सध्याच्या परिस्थितीत पुढील रणनीतीबाबत त्यांनी घराघरांत जाऊन संवाद वाढवणे आणि प्रश्नाधारित प्रचारावर लक्ष केंद्रित करण्याची दिशा स्पष्ट केली.
शेवटी त्यांनी मतदारांना आवाहन करत सांगितले की, ही निवडणूक केवळ पक्षांची नाही, तर विचारांची आहे. पुस्तक या चिन्हावर मतदान करून अन्यायाविरोधात आणि स्वच्छ, पारदर्शक राजकारणासाठी साथ द्या.
