MPSC पेपरफुटी प्रकरणाच्या चौकशीसाठी आयएएस तुकाराम मुंढे यांची सचिवपदी नियुक्ती; अध्यक्ष विवेक भीमनवार स्वतःहून रजेवर

ps logo rgb

(ऑनलाईन परिवर्तनाचा सामना)

एमपीएससी पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि दोषींवर कारवाई करावी, या मागणीसाठी पुण्यात स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने आंदोलन करत होते. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देत आमदार रोहित पवार यांनीही आंदोलनात सहभाग घेतला होता. या वाढत्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, अखेर राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. या प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या चौकशी समितीच्या सचिवपदी धडक निर्णय घेण्यासाठी प्रसिद्ध असलेले आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी केली.

रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाचा संदेश घेऊन आलेले मंत्री शिवेंद्रसिंह राजे आणि आमदार रोहित पवार यांच्यात एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीनंतरच आंदोलक विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्यांची दखल घेत ही मोठी घोषणा करण्यात आली.

दरम्यान, आंदोलक विद्यार्थ्यांकडून एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याचीही जोरदार मागणी करण्यात येत होती. या आंदोलनादरम्यान भीमनवार यांना सरकारने सक्तीच्या रजेवर पाठवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर रंगली होती. मात्र, विवेक भीमनवार यांनी स्वतः सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या चर्चांना पूर्णविराम दिला.

भीमनवार यांनी स्पष्ट केले की, त्यांना सरकारने सक्तीच्या रजेवर पाठवलेले नसून, त्यांनी स्वतःहून रजेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने या प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीची घोषणा केल्यामुळे, चौकशी पूर्ण होईपर्यंत पदावर कार्यरत राहणे नैतिकतेच्या दृष्टीने योग्य नाही, असे मानून त्यांनी हा पाऊल उचलले. एमपीएससीची स्वायत्तता, विश्वासार्हता आणि विद्यार्थीहित यांना आपण नेहमीच प्राधान्य दिले असून यापुढेही ते कायम राहील, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले.

आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडे चौकशी समितीची सूत्रे सोपवली जाणे आणि अध्यक्ष विवेक भीमनवार रजेवर जाणे, यामुळे पुण्यातील या विद्यार्थी आंदोलनाला आता एक अत्यंत महत्त्वाचे वळण मिळाले आहे. या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी आता कशा प्रकारे पुढे सरकते, चौकशीचा अंतिम निष्कर्ष काय निघतो आणि दोषींवर काय कारवाई होते, याकडे संपूर्ण महाराष्ट्रातील एमपीएससी विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

Latest News