लॉकडाऊन 14 एप्रिलनंतर संपेल असं कोणीही समजू नये- आरोग्यमंत्री राजेश टोपे


मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर 24 मार्चला देशात 21 दिवस संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा केली. त्यामुळे लोकं आता लॉकडाऊन संपायची वाट पाहत आहे. कधी 14 तारीख उजाडते असं अनेकांना झालंय. मात्र 14 एप्रिलनंतरही लॉकडाऊन संपेल अशी शक्यता कमी आहे. कारण 15 एप्रिलनंतर लॉकडाऊन 100 टक्के शिथील होईल असं कुणीही गृहीत धरु नये, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. लॉकडाऊनबाबतची निर्णय प्रक्रिया 10 एप्रिलनंतर सुरु होईल. मुंबईतील आणि महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. चिंतेची बाब म्हणजे महाराष्ट्रातील मृत्यूदर अपेक्षेपेक्षा जास्त असून तो पाच टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. अशा परिस्थितीत योग्य खबरदारी घेणे महत्त्वाचं आहे. त्यामुळे लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने उठवला जाऊ शकतो. लॉकडाऊन उठवण्याची प्रक्रिया केंद्र सरकारच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात येईल, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.