भाजपच्या मनसुब्यांना उपमुख्यमंत्री अजित पवारचा दणका

पुणे – शहरातील 6 मीटर रस्ते 9 मीटर करण्यासाठी हरकती आणि सूचना मागविण्याचा निर्णय पालिकेतील सत्ताधारी भाजपने स्थायी समितीत बहुमताच्या जोरावर घेतला. पण, या निर्णयासह महापालिकेतील सर्वच विरोधीपक्षांनी आक्षेप घेत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार केली आहे. त्याची दखल घेत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढील आठवडयात मंगळवारी मंत्रालयात नगर विकास विभाग खात्याच्या प्रधान सचिवांची बैठक बोलविली आहे. त्यामुळे या बैठकीत या प्रस्तावाचे भवितव्य ठरणार असून भाजपच्या रस्ते रुंदीकरणाच्या मनसुब्यांवर पाणी फेरले जाण्याची शक्यता आहे.
या निर्णयाबाबत उपमुख्यमंत्री पवार यांची आमदार चेतन तुपे, सुनील टिंगरे, महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी भेट घेतली. तसेच ही प्रक्रिया नियमबाह्य असल्याने हा प्रस्ताव रद्द करण्याची मागणी त्यांच्याकडे करण्यात आली.
दरम्यान, पवार यांनी महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांच्या शंका ऐकल्यानंतर याबाबत नगरविकास प्रधान सचिवांसोबत बैठक आयोजित करण्याचा निर्णय घेतला. या बैठकीत महापालिकेचा प्रस्ताव योग्य आहे का? महाराष्ट्र प्रादेशिक नगर नियोजन अधिनियमाच्या 31(1) अनुसार रस्ते रूंद करण्याची प्रक्रिया करावी का? याचाही निर्णय घेतला जाणार आहे.