काळ आला, पण वेळ आली नाही…’ ही म्हण या बाळाच्या बाबतीत ”पुण्यात खरी ठरली”

पिंपरी – चासकमान जि. पुणे येथे ‘निसर्ग’ चक्रीवादळापासून सुरक्षित राहण्यासाठी एक कुटुंब आपल्या घराचे दारे-खिडक्‍या बंद करून वादळ जाण्याची वाट पाहत होते. घरातील लोखंडी रॉडला कापडी झोळी बांधून दोन महिन्यांच्या बाळाला झोपवले होते. ज्या लोखंडी रॉडला बाळाची झोळी बांधली होती, तो रॉड वादळाच्या तडाख्याने छतासह उचकटला. सोबतच झोळीत असणारे बाळ हे सुमारे वीस फूट उंचावर फेकले गेले. तसेच, प्रचंड वेगाने जमिनीवर आदळले. छत व लोखंडी रॉड बाळाच्या बाजूला पडल्यामुळे हे बाळ थोडक्‍यात बचावले. मात्र, त्याची परिस्थिती चिंताजनक असल्याने सुरवातीला मंचर येथील रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविले. या चिंताजनक स्थितीतून बाळाला बाहेर काढण्यास डॉक्‍टरांना यश मिळाले. त्यामुळे ‘काळ आला; पण वेळ आली नाही…’ ही म्हण या बाळाच्या बाबतीत शब्दश: खरी ठरली आहे. डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात बाळाला आणल्यानंतर रुग्णालयातील बालरोग विभागाने त्वरित उपचार सुरू केले. रुग्णालयातील बाल मेंदूरोग तज्ज्ञ

डॉ. विश्‍वनाथ कुलकर्णी यांनी बाळाचे निदान केले. बाळाला उलटी होत होती. हलके झटके येत असल्याने एक्‍स-रे व एमआरआय तसेच इतर तपासण्याद्वारे असे दिसून आले की बाळाची कवटी फ्रॅक्‍चर झाली आहे. मेंदूला हादरा बसल्याने त्याला इजा झाली आहे. मात्र शरीरातील इतर अवयवांना कुठे इजा व दुखापत नव्हती. कवटी फ्रॅक्‍चर व मेंदूतील इजा झाल्यामुळे बाळाला डॉ. मनोजकुमार पाटील व सहकारी यांच्या देखरेखीखाली अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. तेथे पाच दिवस त्याच्यावर उपचार सुरू होते. बाळाने या उपचारांना सकारात्मक प्रतिसाद दिला. या चिंताजनक स्थितीतून बाळास बाहेर काढण्यात डॉक्‍टरांना यश मिळाले. बाळाच्या पुन्हा सर्व तपासण्या केल्या आहेत.

हे बाळ सध्या सुखरूप आहे. त्याला सामान्य वार्डमध्ये हलविले आहे. लवकरच डिस्चार्ज दिला जाणार आहे, अशी माहिती बालरोग विभागाच्या युनिट प्रमुख डॉ. शैलजा माने यांनी दिली. बाळावरील सर्व उपचार डॉ. माने यांच्या युनिटच्या देखरेखीखाली करण्यात आले. बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. शरद अगरखेडकर तसेच वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जे. एस. भवाळकर यांचे मार्गदर्शन लाभले. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, विद्यापीठ सोसायटीच्या उपाध्यक्षा डॉ. भाग्यश्री पाटील, विश्‍वस्त डॉ. सोमनाथ पाटील, डॉ. स्मिता जाधव, ट्रस्टी व कोषाध्यक्ष डॉ. यशराज पाटील यांनी बाळावर यशस्वी उपचार करणारे सर्व डॉक्‍टर, परिचारिका आणि कर्मचारी वर्गाचे कौतुक केले.

Latest News