पंजाब: ”शनिवार – रविवार” सक्तीने लॉकडाऊन – पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग

चंदीगड : देशभरात लॉकडाऊनच्या निर्बंधांमध्ये शिथिलता आल्यानंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. यामुळे देशातील अनेक राज्यांची स्थिती वाईट होत आहे. याच पार्श्वभूमीवर पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी कोराना संसर्ग रोखण्यासाठी काही मोठे निर्णय घेतले आहेत. यानुसार आता पंजाबमध्ये वीकेंडच्या दिवशी कठोर नियमांचं पालन करावं लागणार आहे. पंजाब सरकारने साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी केवळ आवश्यक वस्तूंची दुकानं खुली करण्यास परवानगी दिली आहे. तसेच दूसऱ्या राज्यांमधून येणाऱ्या नागरिकांवर देखील प्रतिबंध लावले आहेत. ज्यांच्याकडे प्रवेश पास असेल अशाच लोकांना प्रवेश दिला जाईल.

वीकेंडच्या दिवशी केवळ मेडिकल स्टोअर आणि अत्याआवश्यक सेवेतील लोकांनाच बाहेर पडण्यास परवानगी असेल. अमरिंदर सिंग यांनी शुक्रवारी (12 जून) अधिकाऱ्यांसोबत शुक्रवारी महत्त्वाची बैठक घेतली. यात राज्याला कोरोनापासून वाचवण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यानंतर पंजाब सरकारने नव्या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या. यानुसार साप्ताहिक सुट्टी आणि सार्वजनिक सुट्टी या दिवशी अंतरजिल्हा प्रवासावर निर्बंध लावण्यात आले आहेत. ई-पास असणाऱ्यांनाच परवानगी दिली जाईल

नव्या मार्गदर्शक सूचना

  • आवश्यक वस्तूंची दुकानं आठवड्यातील सर्व दिवस सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरु राहतील.
  • रविवारी आवश्यक सेवा देणारी दुकानं वगळता इतर सर्व दुकानं पूर्णवेळ बंद राहतील.
  • लग्न किंवा इतर कार्यक्रमांसाठी ई-पास दिले जातील. यामध्ये केवळ 50 लोकांना सहभागी होता येईल.
  • आंतरराज्‍यीय वाहतुकीसाठी ई पास बंधनकारक असेल. हा पास केवळ अत्यावश्यक सेवेशी संबंधित लोकांनाच दिला जाईल.

देशभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. आतापर्यंत भारतातील कोरोना रुग्णांचा आकडा 3 लाखाच्या वर गेला आहे. तसेच कोरोनामुळे 8 हजारहून अधिक मृत्यू झाले आहेत.

Latest News