कोरोना चाचणीच्या दरात कपात – राजेश टोपे

मुंबई – कोरोना चाचणीच्या दरात कपात करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच आयसीएमआरने कोरोना चाचणीचे निश्चित केलेले 4500 हे शुल्क रद्द करत नवे दर ठरवण्याचे निर्देश राज्यांना दिले होते. त्यानुसार कोरेना चाचणीच्या दरात 50 टक्के कपात करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे सामान्यांना दिलासा मिळाला असून खासगी लॅबना चांगलाच दणका बसला आहे.
एकीकडे राज्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. मात्र कोरोनाची चाचणी करण्यासाठी भरावे लागणारे शुल्क हे सामान्यांना परवडण्यासारखे नाहीत. त्यामुळे यापूर्वी खासगी लॅबमध्ये आकारले जाणारे ४५०० हे शुल्क कमी करून ते आता २२०० रुपये इतके घेतले जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी एका माध्यमाशी बोलताना दिली आहे.
दरम्यान, आयसीएमआयने सर्व राज्यांना कोरोना चाचणीचे शुल्क निश्चित करण्याबाबत सांगितले होते. त्यानुसार राज्य सरकारने हे दर निश्चित करण्यासाठी एक समिती नेमली होती. यामध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे हे समितीचे अध्यक्ष होते. तसंच आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे, जे जे वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. अमिता जोशी व वैद्यकीय शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले यांचा या समितीत समावेश होता. या समितीने दरांसंदर्भातील अहवाल सरकारकडे सादर केला होता. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
अशी असेल कपात
नवे दर निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार व्हीटीएमच्या माध्यमातून रुग्णालयातून स्वॅब टेस्ट करून घेतल्यास २२०० रु शुल्क आकारले जातील. तर घरी जाऊन स्वॅब घेतल्यास २८०० रु शुल्क असेल. याआधी रुग्णालयातून स्वॅब घेतल्यास ४५०० तर घरी येऊन स्वॅब घेतल्यास ५२०० रुपये शुल्क आकारले जात होते, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.