प्रियकराने लग्नाला नकार दिल्याने ”तरुणीने स्वत:ला केले क्वारंटाईन”

नाशिक: प्रियकराने लग्नाला नकार दिल्याने तब्बल तीन दिवस अन्नत्याग करीत खोलीत कोंडून घेतलेल्या तरुणीचे मन अखेर निर्भया पथकाने वळवले. घरची परिस्थिती बेताची असल्याने लगेचच लग्न करणे शक्य नसल्याचे तरुणाने सांगितले. त्या दोघांचेही पथकाने समुपदेशन केले. किमान तीन वर्षे थांबा, त्याला नोकरी, व्यवसायाला लागू दे, हे तरुणीलाही पटले. त्यामुळे पालकांचाही जीव भांड्यात पडला.
नाशिक शहरातील सारडा सर्कल भागातील 18 वर्षीय तरुणीचे गेल्या काही वर्षांपासून परिसरातील तरुणावर प्रेम होते. मात्र, त्याने लग्नाला नकार दिल्यामुळे ती संतापली. रागाच्या भरात तिने रविवारपासून एका खोलीतच स्वत:ला कोंडून घेत अन्न-पाण्यालाही स्पर्श केला नाही. ती काहीच ऐकत नसल्याने अखेर वडिलांनी मंगळवारी मुंबई नाका पोलीस ठाणे गाठून हकिकत सांगितली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय डमाळ यांनी निर्भया पथकाच्या उपनिरीक्षक नेहा सूर्यवंशी यांना ही माहिती दिली. त्यानुसार उपनिरीक्षक सूर्यवंशी यांच्यासह पोलीस नाईक अनिता पाटील, सरला घोलप, शुभांगी आवारे यांनी मुलीच्या घरी जावून तिला समजावले. त्यानंतर तिने जेवण केले.
पुढे पथकाने बुधवारी त्या तरुणाचीही भेट घेतली. घरची परिस्थिती हलाखीची असून, मोठ्या भावाचे लग्न बाकी आहे, त्यामुळे लगेच लग्न करणे शक्य नसल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर शुक्रवारी दोघांनाही पोलीस ठाण्यात बोलवून त्यांचे समुपदेशन करण्यात आले. तोदेखील 18 वर्षांचा आहे. पुढची तीन वर्षे तरी थांबा, त्याला नोकरी, व्यवसाय करू दे, असे सूर्यवंशी यांनी सांगितले. पालकांनीही तिची समजूत घातली. सगळ्यांचे म्हणणे तरूणीलाही पटले. वेळीच समुपदेशन झाल्याने अनर्थ टळला.