परमबीर सिंग,स्वतःला वाचवण्यासाठी आरोप-गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई – मुंबई पोलीस दलातील निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना दरमहा १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिले होते, असा खळबळजनक आरोप या पत्रातून केला आहे. या मुख्य आरोपासोबतच त्यांनी देशमुख यांच्यावर इतर अनेक आरोपही केले आहेत. मात्र, अनिल देशमुख यांनी सिंग यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले असून हे सगळं षडयंत्र असल्याचं म्हटलं आहे. ‘सिंग यांनी माझ्यावर केलेले आरोप खोटे असून स्वतःचा बचाव करण्यासाठी मला आणि महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी त्यांनी रचलेलं हे षडयंत्र आहे. सिंग यांनी आरोप सिद्ध करावेत’, असे थेट आव्हान देत देशमुख यांंनी सिंग यांच्यावर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार असल्याची माहिती दिली आहे. देशमुखांनी काढलेलेल्या प्रसिद्धी पत्रकात हे स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या पत्रात एसीपी पाटील यांचा उल्लेख केला आहे. पाटील यांनी पैसे वसुलीसंदर्भात सगळी माहिती दिल्याचा दावा सिंग यांनी केलाय. पाटील यांच्यासोबत झालेली चॅटिंगसुद्धा त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या पत्रात तपशीलवार दिली आहे. याच चॅटिंगवर बोट ठेवत देशमुख यांनी अनके प्रश्न उपस्थित केले आहेत. ‘आपणास आयुक्त पदावरून हटविण्यात येणार आहे हे लक्षात आल्यानंतर परमबीर सिंग यांनी आदल्या दिवशी म्हणजेच दिनांक 16 मार्चला एसीपी पाटील यांना व्हॉटसऍप चॅटवरून काही प्रश्न विचारले. पाटील यांच्याकडून अपेक्षित असलेली उत्तरे सिंग यांनी मिळविली. हा परमबीर सिंग यांच्या मोठ्या कटाचाच एक भाग होता. या चॅटच्या माध्यमातून परमबीर सिंग यांना पध्दतशीरपणे पुरावे जमा करायचे होते. या चॅटवरून उत्तरे मिळविताना परमबीर सिंग किती अधीर झाले होते हे त्यांच्या चॅटवरून आपल्या लक्षात येईल. परमबीर सिंग हे एसीपी पाटील यांच्याकडून वारंवार वदवून घेत आहेत. याचा अर्थ काय?’, असा सवाल देशमुख यांनी उपस्थित केला आहे.

महत्त्वाचे म्हणजे परमबीर सिंग यांचे आरोप फेटाळत असताना गृहमंत्र्यांनी शनिवारी दोन ट्विट केले आहेत. यातल्या एका ट्विटमध्ये त्यांनी ‘मनसुख हिरेन हत्याप्रकरण’ असे म्हटले आहे. त्यामुळे हिरेन यांची हत्या झाल्याची कबुली खुद्द गृहमंत्र्यांनीच दिली आहे. ‘मुकेश अंबानीप्रकरणी तसेच मनसुख हिरेन हत्याप्रकरणी सचिन वाझे यांचा सहभाग स्पष्ट होत असताना आणि त्याचे धागेदोरे तत्कालीन पोलीस आयुक्त श्री परमबीर सिंग यांच्यापर्यंत पोहोचणार असल्याची शक्यता तपासातून होत असताना, परमबीर सिंग यांनी स्वतःला वाचवण्यासाठी तसेच पुढच्या कायदेशीर कारवाईपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी हा खोटा आरोप केला आहे’, असे ट्विट अनिल देशमुख यांनी केले आहे. तसेच काल दिल्लीत पत्रकारांशी बोलतानादेखील देशमुख यांनी हिरेन प्रकरणाचा उल्लेख करताना हत्या शब्द वापरला होता