आसाम मध्ये भाजपच्या आमदाराच्या गाडीत ईव्हीएम मशीन सापडले

आसाम |भाजप आणि काँग्रेस या निवडणुकांसाठी पुर्ण जोर लावताना दिसत आहे. यातच आसामच्या निवडणुकीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आसाममधील भाजपच्या आमदाराच्या गाडीत चक्क इलेक्ट्राॅनिक वोटिंग मशीन म्हणजे ईव्हीएम सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.दरम्यान, जेव्हा ईव्हीएमची तपासणी करण्यात आली तेव्हा ते सील होते, अशी माहिती सांगण्यात येत आहे. निवडणूक आयोगाकडून या प्रकरणी 4 अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे.

रात्रीच्यावेळी स्थानिक लोकांनी आमदाराची गाडी आडवली होती. त्यावेळी त्याच गाडीत स्थानिक मतदान अधिकारी बसले होते. संतप्त  स्थानिकांनी अधिकाऱ्याला बाहेर काढलं. गाडीची मागची बाजू उघडली, तेव्हा त्यात चक्क ईव्हीएम मशीन सापडलं. या प्रकरणात निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घेत कारवाई केली आहे.

भाजपच्या या आमदाराचं नाव क्रिशनेन्दू पाॅल आहे, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे.मतदान अधिकाऱ्याची कार बिघडल्याने, या अधिकाऱ्याने आमदाराला लिफ्ट मागितली. आमदारांनीही या अधिकाऱ्याला लिफ्ट दिली, अशी माहिती निवडणूक आयोगाला मिळाली आहे. स्थानिक अधिकाऱ्याला ती गाडी आमदारांची होती हे माहित नव्हतं, अशी प्राथमिक माहिती जिल्हा निवडणूक आधिकाऱ्याकडून सांगण्यात आली आहे.

संबंधित गाडी ही आमदाराच्या नावावर होती हे स्पष्ट झालं आहे.देशात सध्या पाच राज्याच्या विधानसभा निवडणूका लागल्या आहेत. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी याचा व्हिडीओ ट्विट केला आहे.