शारदा चिट फंड घोटाळ्याप्रकरणी टीएमसीच्या दोन नेत्यांची कोटींची संपत्ती जप्त

mamata-banrji

कोलकाता:  टीएमसीचे प्रवक्त कुणाल घोष आणि टीएमसीचे खासदार शताब्दी रॉय यांच्यासह शारदा समूहाच्या प्रमुख सुदिप्त सेन यांच्या सहकारी देवजारी मुखर्जी यांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. या तिघांची एकूण तीन कोटींची संपत्ती ईडीने जप्त केली.

. एप्रिल 2013मध्ये शारदा चिट फंड घोटाळा उघड झाला होता. तब्बल दहा हजार कोटी रुपयांचा हा घोटाळा असल्याचं सांगण्यात येतं. ईडीच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार शारदा चिट फंड घोटाळ्याप्रकरणी कुणाल घोष, शताब्दी रॉय आणि देवजारी मुखर्जींकडून 3 कोटींची स्थावर आणि जंगम मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

2 मार्च रोजी घोष यांची चौकशी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.  पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचं रण तापत असतानाच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मोठा झटका बसला आहे. शारदा चिट फंड घोटाळ्याप्रकरणी टीएमसीच्या दोन नेत्यांची तीन कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. ईडीने ही कारवाई केली असून त्यामुळे टीएमसीमध्ये एकच खळबळ उडाली आहे

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तपास यंत्रणा सक्रिय झाल्या आहेत. टीएमसीचे माजी खासदार कुणाल घोष हे शारदा मीडिया समूहाचे सीईओ होते. मीडिया समूहाचा प्रमुख होण्यासाठी त्यांनी शारदा समूहाकडून मोठी रक्कम घेतल्याचा घोष यांच्यावर आरोप आहे. घोष यांची यापूर्वी जुलै 2019मध्ये आणि ऑक्टोबर 2013मध्ये याप्रकरणी तपास यंत्रणांनी चौकशी केली होती. त्यांची तुरुंगातही रवानगी करण्यात आली होती. सध्या ते जामिनावर आहेत. ईडीने नुकतेच त्यांना चौकशीसाठी बोलवलं होतं.

टीएमसीच्या खासदार शताब्दी रॉय या शारदा समूहाच्या ब्रँड अॅम्बेसिडर होत्या. तर देवजारी मुखर्जी या शारदा ग्रुफ ऑफ कंपनीजच्या संचालक होत्या. या घोटाळ्यात ईडीने आतापर्यंत मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी 600 कोटी रुपयांपेक्षा अधिक मूल्याची संपत्ती जप्त केली आहे.

ऐन निवडणुकीच्या काळात कारवाई

ईडीने ऐन निवडणुकीच्या काळात छापेमारी केल्याने एकच खळबळ उडाली आहे. निवडणुकीच्या काळात पक्षाची प्रतिमा मलिन करून त्याचा फायदा उचलण्याचा भाजपकडून प्रयत्न होत असल्याचा आरोप टीएमसीने केला आहे.

Latest News