ठाकरे सरकारने मराठा समाजाला सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक मागास सिद्ध करणं गरजेचं…
‘नवीदिल्ली : राज्य सरकारने मराठा समाजाला सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक मागास सिद्ध करणं गरजेचं आहे. जो पर्यंत मराठा समाज सामाजिक मागास सिद्ध होत नाही तोपर्यंत राज्यांचे अधिकार अबाधित असले तरी स्वतःला SEBC करून घेऊ शकत नाही. केंद्र सरकारकडून देखील आरक्षण वाढवून घ्यायचं असेल तर SEBC असल्याचं सिद्ध न झाल्यास काहीच उपयोग होणार नाही,’ अशी माहिती देत संभाजीराजे यांनी सर्व सविस्तर भूमिका राष्ट्रपतींना सांगितल्याचे स्पष्ट केले
. राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये या मुद्द्यावरून आमने-सामने आले आहेत. यातच आता मराठा आरक्षणाचा प्रश्न राष्ट्रपतींपुढे मांडून मराठा समाजाला असलेली आरक्षणाची गरज व समाजाच्या भावना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या भेटीनंतर संभाजीराजेंनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे.
यावेळी त्यांनी केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींकडून अपेक्षित असलेले सहकार्य स्पष्ट केल्यानंतर राज्य सरकारने काय करायला हवं याबाबत देखील त्यांनी राष्ट्रपतींना माहिती दिल्याचे सांगितले. यासोबतच, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शिष्टमंडळाकडून मागणी आणि सविस्तर माहिती जाणून घेतल्यानंतर आपली प्रतिक्रिया दिली. ‘मी सर्व शांतपणाने ऐकून घेतलं आहे. मला थोडा वेळ द्या. यावर मी अभ्यास करतो आणि पुढची दिशा काय असेल ते आम्ही कळवतो,’ असं राष्ट्रपतींनी सांगितलं आहे
. यावर आम्ही समाधानी आहोत, त्यांनी सर्वांचे मत हवं तितका वेळ देऊन ऐकून घेतल्या म्हणून आम्ही सर्व पक्षीयांकडून राष्ट्रपतींचे आभार मानतो, असं देखील संभाजीराजे यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले.