ताराचंद रुग्णालयासाठी ऑक्सिजन प्लांटचे राज्यपालांचे हस्ते होणार लोकार्पण…

पुणे- भारत विकास परिषदेच्या वतीने पुण्यातील सेठ ताराचंद रामनाथ आयुर्वेदिक रुग्णालयासाठी पूर्ण क्षमतेचा ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आला आहे. या प्लांटचा लोकार्पण सोहळा येत्या 17 सप्टेंबर रोजी महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल श्री. भगतसिंह कोश्यारी यांच्या शुभहस्ते संपन्न होणार असल्याचे परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दत्ता चितळे, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य राजेंद्र जोग, विश्वस्त राहुल सोलापूरकर व शिवाजीनगर पुणे शाखेचे अध्यक्ष मंदार जोग यांनी आज येथे पत्रकार परिषदेत सांगितले
. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून 17 सप्टेंबर रोजी दुपारी 4.30 वाजता सदरचा लोकार्पण सोहळा होणार असून हा कार्यक्रम कोरोना नियमांमुळे फक्त निमंत्रितांसाठी होणार आहे. कोरोना काळात ऑक्सिजन अभावी रुग्णांचे झालेले हाल लक्षात घेऊन ऑक्सिजन टंचाई होऊ नये यासाठी सुमारे 40 लाख रुपये खर्च करुन हा प्लांट उभारण्यात आला आहे. एकावेळी सुमारे शंभर रुग्णांना उपयोगी होईल असा हा प्लांट असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
कोरोना काळात गेल्या दिड वर्षात भारत विकास परिषदेच्या वतीने विविध उपक्रम राबवण्यात आले. त्यामध्ये तीन रक्तदान शिबिरे (सुमारे एक हजार व्यकींचे रक्तदान), सुमारे 2 हजार डॉक्टरांसाठी फेसशिल्ड, 10 हजारांहून अधिक सॅनिटायझर बाटल्यांचे वितरण, गरजूंसाठी सुमारे 2 हजार किराणा किट वाटप, समुपदेशनासाठी आरोग्यमित्र योजना राबविण्यात आली आहे. भारत विकास परिषदेच्या वतीने गेल्या 15 वर्षांपासून पुणे येथे कायमस्वरुपी कृत्रिम पाय रोपण व्यवस्था सुरु असून सुमारे 20 हजार गरजूंनी याचा लाभ घेतला आहे. विकलांग मुक्त भारत हा संकल्प घेवून सेवा, समर्पण आणि सहयोग या त्रिसूत्रीच्या आधारे सन 1963 पासून भारत विकास परिषदेचे काम संपूर्ण देशभर सुरु आहे.