नर्सच्या वेशभूषेत आलेल्या महिलेने ससून मधून तीन महिन्याच्या बाळाला पळविले.., आरोपीला अटक

पुणे: पुण्यातील प्रसिद्ध ससून रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ३ महिन्याच्या मुलीला नर्सच्या वेशभूषेत आलेल्या महिलेने वॉर्डातून पळवून घेऊन गेल्याची घटना घडली आहे. २२ वर्षीय महिला आणि तिची तीन महिन्याची मुलगी अनेक दिवसापासून ससून रुग्णालयात उपचार घेत होते.संबंधित चोरट्या दाम्पत्याला मूलबाळ होतं नसल्यानं त्यांनी ३ महिन्यांचं बाळ पळवल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे
. पुण्यातील प्रसिद्ध ससून रुग्णालयात चक्क नर्सच्या वेशभूषेत येऊन बाळ पळवल्यानं ससून रुग्णालयाच्या सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेसह तिच्या पतीला अटक केली असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
२६ वर्षीय आरोपी महिला आपल्या पतीसोबत नर्सचा वेषातर करून ससून रुग्णालयात शिरली होती. याठिकाणी आरोपी महिलेनं संधी साधून एका ३ महिन्याच्या मुलीला वॉर्डातून पळवलं आहे. आपलं बाळ गायब असल्याचं पाहून बाळाच्या आईनं रुग्णालयातच हंबरडा फोडला होता.रुग्णालय प्रशासनाला याची माहिती मिळाल्यानंतर रुग्णालयात एकच गोंधळ उडाला होता.
त्वरित पोलिसांना याची माहिती दिल्यामुळे नर्सच्या वेशात आलेल्या आरोपी महिलेला आणि तिच्या पतीला अटक करण्यात आली आहे. तसेच पोलिसांनी बाळाची आरोपींच्या तावडीतून सुटका केली असून तिला सुखरूप आईच्या ताब्यात दिलं आहे.