भ्रष्टाचारा विरुद्धची लढाई सुरूच राहिल- देवेंद्र फडणवीस

गोवा : ‘देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच असं झालं असेल की, एखादा व्यक्ती म्हणतो मी भ्रष्टाचाराविरुद्ध तक्रार करायला जातो आणि पोलिस त्याला अडवतात. विशेष म्हणजे कारण हे सांगितलं जातं की, ज्यांच्याविरुद्ध तुम्हाला तक्रार करायची आहे, त्यांचे कार्यकर्ते दंगा करतील, म्हणून तुम्हाला जाता येणार नाही. स्वतंत्र भारतात अशी कायदा-सुव्यवस्था कधीच पाहायला मिळाली नसेल, महाराष्ट्रात तर नाहीच नाही,’ असं म्हणत सोमय्यांवरील कारवाईचा फडणवीसांनी समाचार घेतला

, ‘हे जे चाललंय ते भयानक आहे, पण भारतीय जनता पार्टी येथे थांबणार नाही. भ्रष्टाचाराविरुद्धची भाजपची लढाई सुरूच राहिल. असं असू शकतं, कदाचित मुख्यमंत्र्यांना माहिती नसेल आणि थेट गृहमंत्रालयाने केली असेल. पण, मुख्यमंत्र्यांनी ही कारवाई थांबवली पाहिजे, ही चुकीची कारवाई आहे.कोल्हापूरकडे निघालेल्या भाजप नेते किरीट सोमय्या यांना आज पहाटे सातारा जिल्ह्यातील कराड रेल्वे स्थानकावरून पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर १२७ कोटीच्या घोटाळ्याचे आरोप केल्यानंतर कोल्हापुरात करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचे मंदिराबाहेरून दर्शन घेऊन सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना आणि इतर ठिकाणी जाऊन सोमय्या हे बेनामी मालमत्तेची पाहणी करणार असल्याचे सोमय्या यांनी जाहीर केले होते

. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस देखील कोल्हापुरात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे संघर्ष टाळण्यासाठी सोमय्या यांना कोल्हापूर जिल्हाबंदी करण्यात आली. तर त्यांना मुंबईतच रोखण्यासाठी पोलिसांनी खूप प्रयत्न केले. कालपासून सुरु झालेल्या या घडामोडी अजूनही सुरु असून सोमय्या यांना आता पोलीस मुंबईत सोडण्यासाठी निघाले आहेत. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारने कायदा मोडून पोलिसांना हाताशी धरून दडपशाही सुरु केल्याची टीका भाजप नेत्यांनी केली आहे.