इंधन दरवाढ माझ्यासमोरील मोठे आव्हान – सीतारामण

Nirmala-Sitharaman-696x392-1

नवी दिल्ली : जागतिक बाजारपेठेत वस्तूंचे, विशेषत: इंधनाचे वाढणारे भाव हे एक मोठे आव्हान आहे. दरवाढ होत असल्याने सरकारच्या खर्चावर मर्यायदा पडत आहेत, ‘ज्या पद्धतीने देशात इंधनाचे दर वाढत आहेत, नवनवे उच्चांक गाठत आहेत, त्याचं मोठं आव्हान माझ्यासमोर आहे. अर्थ विभागातील आमची टीम देखील याकडे अभ्यासपूर्वक पद्धतीने पाहात आहे. दरवाढीची अनिश्चितता हे माझ्यासमोरील मोठे संकट आहे.’ दररोज इंधन दरवाढ होत असल्याने सामान्य माणूस हतबल झाला असून देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण याही हतबल झाल्याचे समोर आले आहे.

करोना काळामध्ये देशभरातील सर्व उद्योग, व्यवसाय बंद असल्याने अर्थव्यवस्था ठप्प होती. त्यामुळे देशाला बसलेल्या आर्थिक फटक्यामधून सावरण्याचा प्रयत्न भारतीय अर्थव्यवस्था करत असल्याचे त्या म्हणाल्या.

विमानासाठी वापरल्या जाणाऱ्या इंधनापेक्षाही वाहनांचे पेट्रोल महाग झाले असून डिझेलचे दरही उच्चांक गाठत आहे. शंभरी पार केलेल्या पेट्रोलपाठोपाठ डिझेलनंही काही ठिकाणी शंभरी पार केली आहे. प्रचंड दरवाढीमुळे देशातील सामान्य जनतेचं आर्थिक गणित कोलमडले आहे. एकीकडे १०० च्या वर पोहोचले पेट्रोल आणि अन्य महागाई यामुळे सामान्य माणूस चिंतेत सापडला आहे.

‘करोनाचे परिणाम’ या मुद्द्यावर न्यूयॉर्कमध्ये त्यांनी नुकतीच एक मुलाखत दिली. त्यात त्यांनी इंधन दरवाढीबाबत चिंता व्यक्त केली.

इंधनाच्या बाबतीत भारत परावलंबी आहे. त्यातच जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर तीन वर्षांच्या उच्चांकी स्तरावर म्हणजे 83 डॉलर्स प्रतिबॅरलवर गेल्याने सरकारच्या चिंतेत भर पडली आहे. देशाला 80 टक्के इंधन परदेशातून आयात करावे लागते. क्रूड तेलाच्या वाढत्या दरामुळे तेल कंपन्यांकडून जवळपास दररोज पेट्रोल-डिझेलची दरवाढ सुरू आहे.

पेट्रोलचे लिटरचे दर 110 रुपये आणि डिझेलचे दर 100 रुपयांच्या वर गेले आहेत. तिकडे घरगुती वापराच्या एलपीजी गॅस सिलिंडरचे दर 900 रुपयांवर गेले आहेत. सीएनजी-पीएनजी गॅसच्या दरातही अलीकडील काळात भरमसाट वाढ झाली आहे. एकंदर वीज आणि इंधन संकटावर तोडगा काढणे अत्यंत आव्हानात्मक काम आहे आणि सरकारला यावर अत्यंत गांभीर्याने काम करावे लागणार आहे.

Latest News