पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या “स्वच्छ सर्वेक्षण २०२२” अंतर्गत गृहनिर्माण संस्थांना स्टार मानांकन

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या “स्वच्छ सर्वेक्षण २०२२” अंतर्गत गृहनिर्माण संस्थांना स्टार मानांकन देण्याबाबत आयाेजित करण्यात आलेल्या स्पर्धेत “ग” प्रभाग अंतर्गत थेरगाव येथील “ग्रीन्स सहकारी गृहरचना संस्थेने ” सर्वाधिक गुण मिळवुन प्रथम क्रमांक पटकावला. तर ‘रॉयल ऑरेंज काउंटी’ आणि ‘स्विस काउंटी थेरगाव यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळवला. यावेळी गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकारी आणि सदस्यांनाही सन्मानित करण्यात आले.स्वच्छाग्रह मोहिमेत सहभाग घेऊन कृतिशील उपक्रम राबवणा-या गृहनिर्माण संस्थांना अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्या हस्ते स्टार मानांकन देऊन गौरवण्यात आले.कचरा वर्गीकरण, कचरा कंपोस्टिंग, सांडपाणी शुद्धीकरण, पुनर्वापर  पावसाच्या पाण्याचे नियोजन आणि सौरऊर्जा वापर या नियमांचे पालन करणाऱ्या ‘ग’ क्षेत्रीय कार्यक्षेत्रातील सोसायट्यांची पाहणी करून त्यांना ‘फाईव्ह स्टार’ मानांकन देण्यात आले आहे. थेरगाव येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमास ‘ग’ प्रभाग अध्यक्ष अभिषेक बारणे, नगरसदस्या झामाबाई बारणे, माया बारणे, उपायुक्त संदिप खोत, सहाय्यक आयुक्त रवीकिरण घोडके, उमाकांत गायकवाड, विजयकुमार थोरात, माजी नगरसेवक सिद्धेश्वर बारणे यांच्यासह विविध सोसायटींचे प्रतिनिधी, हाॅटेल व्यावसायिक, स्वच्छता स्वयंसेवक, महापालिकेचे अधिकारी , कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते.निसर्गस्नेही, पर्यावरण सुसंगत अशी जीवनशैली रोजच्या जगण्याचा भाग बनली पाहिजे, असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी केले. नागरिकांनी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, शहरातील इतर सोसायट्यांनी यापद्धतीने घनकचरा व्यवस्थापन करुन कंपोस्टींग प्रकल्प उभारावेत, असे आवाहनही त्यांनी केले.भावी पिढीच्या गरजा धोक्यात न आणता सध्याच्या पिढीच्या गरजा पुर्ण करणारे नागरिक शाश्वत विकास करत असतात, असे मत सहाय्यक आयुक्त रवीकिरण घोडके यांनी मांडले.यावेळी ग्रीन्स सोसायटीतील उपक्रमांची पाहणी करण्यात आली. तेथील पदाधिका-यांनी सोसायटीत राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमांबाबत माहिती दिली. खिंसवरा पाटील शिक्षण संकुलातील विद्यार्थ्यांनी स्वच्छता व प्लास्टिक बंदी या विषयावर पथनाट्य सादर केले. तर मराठवाडा मित्र मंडळ पाॅलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तुपासून निर्माण केलेल्या टिकाऊ आणि शोभेच्या वस्तुंचे प्रदर्शन केले. महापालिकेच्या वतीने स्वच्छते संदर्भात राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमावर आधारित लघुचित्रपट यावेळी उपस्थितांना दाखवण्यात आले. पिंपरी चिंचवड महापालिकेने “स्वच्छ सर्वेक्षण २०२२” मध्ये सहभाग नोंदवला आहे. नागरिकांनी स्वच्छतेसंबंधी जागरुक होऊन पिंपरी चिंचवड शहराला देशातील प्रथम क्रमांकाचे स्वच्छ, सुंदर आणि निरोगी शहर बनवण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले.