पंजाब राज्‍यात भ्रष्‍टाचारविरोधी हेल्‍पलाईनची मुख्‍यमंत्री भगवंत मान यांची घोषणा..

अमृतसर: ऑनलाइन परिवर्तनाचा सामना :भगवंत मान यांनी भ्रष्‍टाचारविरोधात कारवाईची घोषणा केल्‍यानंतर दिल्‍लीचे मुख्‍यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही लाच मागणार्‍यांचे व्‍हिडीओ आणि ऑडियो रेकॉर्ड करा, असे आवाहन केले आहे.पंजाब मुख्‍यमंत्रीपदाची सुत्रे हाती घेतल्‍यानंतर भगवंत मान ॲक्‍शन मोडमध्‍ये आले आहेत. त्‍यांनी राज्‍यात भ्रष्‍टाचारविरोधी हेल्‍पलाईनची घोषणा केली आहे. २३ मार्च या शहीद दिनापासून भ्रष्‍टाचारविरोधी हेल्‍पलाईन सेवेचा प्रारंभ होईल. पंजाबराज्‍यातील नागरिक एका व्‍हॉटस ॲप नंबरच्‍या माध्‍यमातून भ्रष्‍टाचाराची तक्रार नोंदवू शकतील. “तुमच्‍याकडे कोणी लाच मागत असेल तर तुम्‍ही त्‍याचा व्‍हिडीओ व ऑडिओ रेकॉर्ड करुन माझा व्‍यक्‍तिगत व्‍हॉटस ॲप नंबरवर पाठवा. भ्रष्‍ट अधिकारी व कर्मचार्‍यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल”, अशी घोषणा भगवंत मान यांनी ट्‍विटरच्‍या माध्‍यमातून केली आहे.मुख्‍यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्‍यानंतर मान यांनी आज राज्‍यातील महसूल आणि पोलिस खात्‍यातील वरिष्‍ठ अधिकार्‍यांबरोबर चर्चा केली. सर्व अधिकार्‍यांनी आपले कर्तव्‍य पार पाडावे, असे आवाहन त्‍यांनी या बैठकीत केले. आमचे सरकार हे पंजाबमधील सर्वात प्रामाणिक सरकार असेल. समाजातील ९९ टक्‍के नागरिक हे प्रामाणिक असतात. मात्र केवळ १ टक्‍के भ्रष्‍ट लोकांमुळे संपूर्ण व्‍यवस्‍था कोलमडते. मी नेहमीच प्रामाणिक अधिकार्‍यांना प्रोत्‍साहन देईन. आता यापुढे पंजाबमधील खंडणी व्‍यवस्‍था पूर्णपणे बंद होईल.

Latest News