बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन, कडक कारवाई करा :आरोग्य मंत्री डॉ. राजेश टोपे


.पुणे : राज्यात बोगस डॉक्टरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हे बोगस रुग्णांना गरजेपेक्षा अधिक प्रमाणात औषधे देऊन त्यांची लूट करु लागल्याचे आरोग्य विभागाच्या निदर्शनास आले आहे. अशा बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन, त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा आदेश राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिला असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बोलताना सांगितले
याबाबत आरोग्य विभागाच्या वतीने गृह विभागाला पत्र देणार असल्याचेही टोपे यांनी यावेळी स्पष्ट केले. दरम्यान, राज्यात मास्क वापरण्याची सक्ती केली जाणार नाही. परंतू नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरावा, असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे
.पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे आयोजित करण्यात आलेल्या साखर परिषदेच्या उद्घाटन समारंभासाठी टोपे आले होते. या समारंभानंतर ते पत्रकारांशी बोलत होते
“राज्यात मुंबई, पुणे ,रायगड ,पालघर या भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे एका सर्वेक्षणातून दिसून आले आहे. केंद्र शासनाकडूनही याबाबत तशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाने मास्क वापरण्याचे हे आवाहन केले आहे.
राज्याच्या आरोग्य विभागातील ९० उच्चपदस्थ अधिकारी नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत. यामुळे आरोग्य विभागातील ही मोठी पदे सध्या रिक्त आहेत. राज्याच्या आरोग्य विभागापुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी सध्या सेवेत असलेल्या अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्याचा विचार असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी यावेळी सांगितले.