”शिवसेना बाळासाहेब” शिंदे यांच्या गटानं आपले नाव…..


शिंदे यांच्या गटाच्या नावात शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे या दोघांचंही नाव आल्याने सेनेच्या गोटात नाराजी वाढली आहे. शिवसैनिकांनी ठिकठिकाणी बंडखोर आमदारांच्या कार्यालयांवर तोडफोड करायला सुरुवात केली आहे. आता शिवसेनेवर अधिकार कोणाचा असा प्रश्न उपस्थित होतोय.बंडखोर आमदार दिपक केसरकर यांनी खरी शिवसेना शिंदेंच्या पाठिशी उभी असल्याचा दावा केला आहे. उद्धव ठाकरे यांना आमचा विरोध नाही. मात्र, खरं हिंदुत्व आमचं आणि शिवसेनेचं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. पुण्यात तानाजी सावंत यांच्या ऑफिसची आज संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी तोडफोड केली.शुक्रवारी कुर्ल्याचे शिवसेना आमदार मंगेश कुडाळकरांच्या कार्यालयावर काही लोकांनी हल्ला केला.त्यांनी गेटची तोडफोड केली. अहमदनगरमध्ये बंडखोर आमदारांचे नेते एकनाथ शिंदे यांच्या फोटोला काळे फासण्यात आले. तोडफोड करणारे लोक शिवसेनेचे असल्याचा आरोप बंडखोर आमदारांच्या समर्थकांनी केला आहे. तोडफोडीच्या घटनेनंतर पोलिसांनी राज्यात हाय अलर्ट जारी केला आहे.शिवसेनेतून बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदे यांच्या गटानं आपले नाव ठरवलं आहे. ‘शिवसेना बाळासाहेब ‘ असे शिंदे गटाचं नाव आहे. आज दुपारी शिंदे गटातील आमदार दीपक केसरकर हे पत्रकार परिषदेत या नावाची घोषणा करणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.या नावाला ठाकरे परिवार, शिवसेना आक्षेप घेणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. याबाबतची लढाई आता न्यायालयात जाणार असे चित्र आहे. शिवसेना नेते बंड पुकारल्यानंतर महाराष्ट्रातल्या सत्तासंग्रामाला शनिवारीही हिंसक वळण लागल्याचे पाहायला मिळालेठाण्यात कायदा व सुव्यवस्था कडेकोट करण्यात आली असून, परिसरात शांतता राखण्यासाठी विविध निर्बंध लादण्यात आले आहेत. एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातील हिंसाचार आणि कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती पाहता पुढील 5 दिवस 30 जूनपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. परिसरात लाठ्या, शस्त्रे, पोस्टर जाळणे, पुतळे जाळणे यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय घोषणाबाजी किंवा स्पीकरवर गाणी वाजवण्यासही बंदी घातली आहे.