महाराष्ट्र जीएसटी विभागाने 13.08 कोटी रुपयांचा बनावट इनपुट टॅक्स क्रेडिटचा घोटाळा केला उघड, पुण्यातील व्यापाऱ्यास अटक…


नवी मुंबई : (. ऑनलाईन परिवर्तनाचा सामना ) – प्रत्यक्षात कुठल्याही प्रकारची खरेदी विक्री न करता तब्बल ७२.६८ कोटींच्या बनावट खरेदी-विक्रीच्या बिलांच्या आधारे बोगस इनपुट टॅक्स क्रेडीट मिळविणाऱया पुण्यातील मे.शिव स्टील ट्रेडर्स या कंपनीवर महाराष्ट्र वस्तू व सेवाकर अन्वेषण विभागाने छापा मारुन १३.०८ कोटी रुपयांचे इनपुट टॅक्स क्रेडिटचा घोटाळा उघडकीस आणला आहे. या कारवाईनंतर महाराष्ट्र वस्तु व सेवाकर अन्वेषण विभागाने अधिक तपास करुन सदर कंपनीच्या मालकाला अटक केली आहे. महाराष्ट्र वस्तू व सेवाकर अन्वेषण विभागाद्वारे या आर्थिक वर्षात आत्तापर्यंत अशाच प्रकारच्या कारवाया करुन २७ जणांना अटक करण्यात आली आहे.
महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाच्या अन्वेषण पथकाकडुन बोगस बिलासंदर्भात विशेष तपासणी मोहीम सुरु असताना पुण्यातील क्रॅप आणि स्टीलच्या मालाची खरेदी विक्री करणाऱया मे.शिव स्टील ट्रेडर्स या कंपनीच्या व्यवहाराबाबत माहिती मिळाली होती. त्यामुळे जीएसटी अन्वेषण विभागाकडुन या कंपनीच्या बोगस बिलासंदर्भात तसेच करचोरी विरोधात विशेष अन्वेषण कारवाई सुरु करण्यात आली होती. या तपासणीत सदर कंपनीने कोणत्याही वस्तुंचा प्रत्यक्षात व्यापार किंवा खरेदी विक्री केले नसल्याचे आढळुन आले. महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाच्या अन्वेषण पथकाने याबाबत केलेल्या सखोल तपासणीत सदर कंपनीने ७२.६८ कोटी रुपयांच्या खोटया पावत्यांचा वापर करुन बेकायदेशीर मार्गाने 13.08 कोटी रुपयांचे इनपुट टॅक्स क्रेडिट मिळविल्याचे आढळुन आले.
त्यानंतर महाराष्ट्र वस्तू व सेवाकर अन्वेषण विभागाने मे.शिव स्टील ट्रेडर्स या कंपनीचा चालक-मालक दौलत शिवलाल चौधरी याला 13 जुलै रोजी अटक केली. चौधरी याला पुणे येथील मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सदरची कारवाई पुणे राज्यकर सहआयुक्त रेश्मा घाणेकर, राज्यकर उपायुक्त (अन्वेषण) सुधीर चेके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक राज्यकर आयुक्त हृषीकेश अहिवळे, चंदर कांबळे, प्रदीप कुलकर्णी, श्रीकांत खाडे व अन्वेषण विभागातील राज्यकर निरीक्षक यांनी केली.
चौकट
बनावट इनपुट टॅक्स क्रेडीटचा घोटाळा करणाऱयावर अंकुश ठेवण्यासाठी महाराष्ट्र जीएसटी अन्वेषण विभागाने जोरदार मोहिम सुरु केली आहे. करचुकवेगिरी करणाऱयांना शोधून काढण्यासाठी जीएसटी अन्वेषण विभागाकडून विशेष तपासणी मोहिम हाती घेण्यात येत आहे. या विशेष मोहिमेच्या माध्यामातुन जीएसटी अन्वेषण पुणे विभागीय अधिकाऱयांनी करचुकवेगिरीच्या प्रकरणांमध्ये पुणे विभागात आत्तापर्यंत एकूण 6 जणांना अटक केली आहे. येत्या काळात जीएसटी विभागात कर चुकवेगिरी करणाऱया तसेच इनपुट टॅक्स क्रेडिट बाबत फसवणूक करणाऱयाविरोधातील मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे राज्यकर उपायुक्त (अन्वेषण) सुधीर चेके यांनी सांगितले.

Latest News