हिंदू- मुस्लीम एकतेची कधी नव्हे इतकी गरज,महमद पैगंबर :मानवतेचे मुक्तिदाता ‘जमाते इस्लामीच्या परिसंवादाला चांगला प्रतिसाद,


‘महमद पैगंबर :मानवतेचे मुक्तिदाता ‘
………………………….
जमाते इस्लामीच्या परिसंवादाला चांगला प्रतिसाद
…………………
हिंदू- मुस्लीम एकतेची कधी नव्हे इतकी गरज : परिसंवादातील सूर
पुणे :
‘जमाते इस्लामी हिंद’ तर्फे ‘महमद पैगंबर :मानवतेचे मुक्तिदाता ‘ विषयावर आयोजित परिसंवादाला चांगला प्रतिसाद मिळाला. गुरुवार,४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता गांधी भवन(कोथरूड) येथे हा परिसंवाद झाला.हिंदू-मुस्लिम एकता मंचाचे संस्थापक स्वामी लक्ष्मीशंकराचार्य( दिल्ली ),युवक क्रांती दलाचे अध्यक्ष डॉ कुमार सप्तर्षी,इस्लामिक विचारवंत डॉ. उमर कहाळे ( लातूर ) , अझहर वारसी इत्यादी मान्यवर या परिसंवादात सहभागी झाले.
देशातील एकता आणि सलोखा वृद्धिंगत व्हावा म्हणून जमाते इस्लामी हिंद (कॅम्प पुणे शाखा) यांच्या वतीने हा परिसंवाद आयोजित करण्यात आला .
डॉ. कुमार सप्तर्षी म्हणाले, ‘महमद पैगंबर यांनी गुलामी, हिंसा विरूध्द शांतता आणि सुरक्षिततेचा संदेश दिला. मानवजातीने अहंकार बाळगू नये, निसर्गाला मानावे अशी शिकवणूक त्यांनी दिली. इस्लाम धर्माच्या शिकवणुकीला चांगला प्रतिसाद मिळत गेला. सुफी पंथाला भारतात प्राणवायू मिळाला. सर्व धर्माना भारतात आश्रय मिळाला आणि प्रत्येक धर्मातील चांगल्या गोष्टी घेऊन सर्वसमावेषक भारतीय संस्कृती तयार झाली.
इतर देशांपेक्षा भारतात मुस्लीमांची सर्वात जास्त लोकसंख्या आहे.परंतू, निवडणुकीत भाजप त्यांना उमेदवारी देत नाही, नागरिकत्वावर प्रश्न विचारले जातात, बुलडोझर चालवले जातात, ही तर अस्पृश्यतेची सुरवात आहे.
नाझी काळात ज्यू समुदायाचे शिरकाण होत असताना जर्मन समुदाय गप्प होता, कारण त्यांना आपल्याला नाझी वादाचा त्रास होणार नाही असे वाटत होते. भारतातदेखील वातावरण बदलत असून इथून पुढे ईडी सारख्या संस्था भारतात बलदंड होतील , कारण प्रत्येकाच्या मागे लावल्या जातील. हिंदू- मुस्लीम एकतेची आज कधी नव्हे इतकी गरज आहे.
हुकूमशाहीचा पराभव होतो, हा जगभराचा इतिहास आहे. तसा पराभव करण्याची संधी जनता शोधत असते. म्हणून आपण लोकशाहीची कास धरली पाहिजे.
स्वामी लक्ष्मीशंकराचार्य म्हणाले, ‘ देशाच्या अखंडतेसाठी सामाजिक एकता गरजेची आहे.एकमेकांच्या धर्माला आपण समजून घेतले पाहिजे.
पैगंबर यांनी मनात आणले असते तर सोन्याच्या महालात राहिले असते, मात्र, त्यांनी साधेपणाने जीवन व्यतीत केले. मानवतेसाठी त्यांनी लढाया केल्या.हजरत महमद पैगंबर हे महानायक होते. तरीही त्यांच्याबाबत वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होतो.हे दुर्दैवी आहे.
डॉ. उमर कहाळे म्हणाले, ‘ महमद पैगंबर यांनी मानवता, विज्ञान यांना महत्व दिले, चालना दिली. शोषीत, शुद्रांना सावकारीतून मुक्त केले. महिलांना विषारी नजरांपासून मुक्ती दिली.बंधने दूर केली. म्हणून ते मानवतेचे मुक्तीदाता ठरले. भारतातील हिंदू – मुस्लीम तणाव मुद्दाम निर्माण करण्याचा प्रयत्न होतो, तो हाणून पाडला पाहिजे.
सभागृहात डॉ. प्रवीण सप्तर्षी, अन्वर राजन, संदीप बर्वे उपस्थित होते . शेख अजीमुद्दीन यांनी सूत्रसंचालन केले.