पुणे महानगरपालिकेतर्फे कचरा संकलन करण्यासाठी भाडेतत्वा वरील वाहनांचे लोकार्पण..

पुणे- ऑनलाईन परिवर्तनाचा सामना –

पुणे महानगरपालिकेतर्फे कचरा संकलन करण्यासाठी भाडेतत्वावर घेण्यात आलेल्या ८० वाहनांचे लोकार्पण राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

पालकमंत्री श्री.पाटील यांनी शहरातील कचरा संकलनाविषयी माहिती घेतली. ओला आणि सुका कचरा वेगळा संकलीत करून सर्व कचऱ्यावर प्रक्रीया होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी या नव्या वाहनांचा उपयोग होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.शहरात दैनंदिन सुमारे २ हजार १०० मे.टन घनकचरा निर्माण होतो. निर्माण झालेला कचरा महापालिकेमार्फत संकलीत करून त्याची विल्हेवाट लावण्यात येते.

त्यासाठी ही नवी वाहने भाडेतत्वावर घेण्यात आली आहेत. या सर्व वाहनांवर जीपीएस आणि आरएफआयडी उपकरणे बसविण्यात आली असून वाहनांच्या कामांची नोंद महानगरपालिकेतील नियंत्रण कक्षाद्वारे घेण्यात येणार आहे.

या वाहनांवर ७ वर्षासाठी सुमारे ३२५ कोटी खर्च होणार आहे.:

ही वाहने शहर स्वच्छता आणि पर्यावरणाच्यादृष्टीने उपयुक्त ठरतील, असा विश्वास श्री.पाटील यांनी व्यक्त केला.शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित या कार्यक्रमाला मनपा आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, उपायुक्त आशा राऊत, महेश डोईफोडे, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, कार्यकारी अभियंता गणेश उगले, कनिष्ठ अभियंता आशिष कोळगे आदी उपस्थित होते.सर्व वाहने बीएस-६ प्रदूषण मानांकनाची असून त्यामुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे. रिफ्यूज कलेक्टर (ओल्या कचऱ्यासाठीचे वाहन) वाहनाचे कचरा एकत्रित केल्यानंतरचे वजन १४ मे.टन असून कचरा वाहून नेण्यासाठी वाहनावर ७ क्यु.मीटरचा कंटेनर आहे. वाहनावरील हायड्रोलिक यंत्रणेमुळे मानवी हस्तक्षेप कमी होण्यास मदत होणार आहे.लहान वाहनांचे कचरा संकलनानंतरचे वजन २.५ मे.टन तर कॉम्पॅक्टर वाहनाचे १८.५ मे.टन आहे. कॉम्पॅक्टर वाहनावर १४ क्यू.मीटर क्षमतेचा कंटेनर बसविण्यात आला आहे. या वाहनात लहान घंटागाड्यांमधून कचरा संकलीत करण्यात येईल. ही वाहने संपूर्ण बंदिस्त स्वरुपात कचरा वाहतूक करणार आहेत.

Latest News