महिलेच्या घरात घुसून जिवंत पेटवले- बिअर बार मालकाने

हिंगणघाट जळितकांडावरून संताप असतानाच औरंगाबादच्या सिल्लोड येथे पुनरावृत्ती

औरंगाबाद – हिंगणघाट येथील जळीत कांडाची घटना ताजी असतानाच आता औरंगाबाद जिल्ह्यातही अशी एक घटना घडली आहे. सिल्लोड तालुक्यातील अंधारी गावात एका बिअरबार चालकाने घरात घुसून महिलेच्या अंगावर रॉकेल टाकून जिवंत पेटवले. यात महिला 95 टक्के भाजली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडिता रविवारी (2 फेब्रुवारी) रात्री अकरा वाजेच्या सुमारास घरी एकटी झोपलेली असताना गावातीलच आरोपी संतोष सखाराम मोहिते घरात प्रवेश केला. यानंतर माझ्या घरात येऊ नकोस, त्यामुळे माझी बदनामी होते असा जाब विचारल्याने आरोपीने तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि तिच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवले. पीडितेने आरडाओरड केल्याने मुलगी आणि जावई मदतीस धावून आले. यानंतर पीडितेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

घाटी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. कैलास धिने यांनी ‘दिव्य मराठी’ला दिलेल्या माहितीनुसार, महिलेला रुग्णालयातील बर्न विभागात उपचार सुरू आहेत. महिला 95 टक्के भाजली असून तिची प्रकृती अत्यवस्थ आहे.

आरोपी संतोष सखाराम मोहिते गावात बिअर बार चालवतो. त्यास अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम 307. 323. 504 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे करीत असून त्यांना सिल्लोड ग्रामीण पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण बिडवे बीट जामदार विठ्ठल चव्हाण साहाय्य करीत आहे.

Latest News