भारतीय लोकशाहीपुढील आव्हाने’ या विषयावर व्याख्यानजनतेचा अंकुश कायमस्वरूपी असला पाहिजे: निखिल वागळे

पुणे: ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-

महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलाच्या वतीने आयोजित ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहा’ निमित्त पुण्यात ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता ‘ भारतीय लोकशाहीपुढील आव्हाने’ या विषयावर ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचे व्याख्यान गांधी भवन येथे झाले. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ.कुमार सप्तर्षी हे अध्यक्षस्थानी होते.

स्वप्नील तोंडे यांनी सूत्र संचालन केले. प्रारंभी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. जांबुवंत मनोहर, रोहन गायकवाड यांनी स्वागत केले.अन्वर राजन, डॉ. उर्मिला सप्तर्षी, संदीप गव्हाणे, डॉॅ. प्रवीण सप्तर्षी,श्रीराम टेकाळे, प्रसाद झावरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

निखिल वागळे म्हणाले,’ लोकसभा निवडणुकीवेळी निर्भय बनो सभेत जाताना आमच्यावर हल्ला झाला आणि आज शांततेत व्याख्यान होत आहे. हा वातावरणातील फरक आहे. गेल्या आठ महिन्यात त्या हल्ल्याचा तपास झाला नाही. महाराष्ट्राला परखड विचार मांडण्याची परंपरा आहे.

पोलीस सरकारच्या संगनमताने काम करतात, हे दुर्दैवी आहे. संविधान जेंव्हा जेव्हा चुकीच्या हातात पडले तेंव्हा असे हल्ले झालेले आहेत. लोकशाही टिकविण्यासाठी बोलावे लागते. या देशातील सर्व समावेशकता, धर्म निरपेक्षता टिकली पाहिजे. निराशावादी असून चालणार नाही. जनतेचा दबाव संपल्याचे जाणवत आहे. लोकप्रतिनिधी नीट काम करण्यासाठीं दबाव गट असणे आवश्यक आहे.

हुकूमशाही पध्दतीने चालणारे सरकार नको हा मतदारांचा संदेश लोकसभा निवडणुकीत दिसून आला. जनतेचा अंकुश कायमस्वरूपी असला पाहिजे. त्या निकालाने लोकशाही टिकण्याची आशा पल्लवीत झाली आहे. पक्षांतर बंदी कायदा मोडीत काढता कामा नये. सर्वोच्च संस्थां बद्दल आदर कायम राहील, याची काळजी घेतली पाहिजे.

त्यांच्या कृतीतून आदर मिळवला पाहिजे. पुढे देशभर पक्षांतर कायदा मोडला गेला तर त्याला सर्वोच्च न्यायालय आणि चंद्रचूड जबाबदार असणार आहेत. बेकायदेशीर सरकार त्यांनी २ वर्षे कसे चालू दिले. उमर खालिदला का जामीन मिळत नाही. आदिवासी, मुस्लीम, दलित, महिला यांचा सहभाग वाढणार नसेल तर लोकशाही टिकणार कशी ? महिलांना पैसे दिले म्हणून त्या मत विकतील असे समजणें हा महिलांचा अपमान आहे.

हरयाणा, जम्मू काश्मीर मध्ये एक पक्ष, एक झेंडा, एक नेता अशी पद्धती चालू देणार नाही, हा संदेश या निवडणुकीतून पुढे येणार नाही. प्रश्न विचारण्याचा अधिकार असला पाहिजे, एवढेच जनतेचे म्हणणे आहे. दहा वर्षात वातावरण विषारी झाले

, कहर झाला होता. जम्मू काश्मीर मध्ये लोकशाहीचे हनन झाले होते. काश्मीर मध्ये राज्यपाल नियुक्त ५ आमदार का निवडले गेले आहेत, त्यांना विधी मंडळात मतदानाचा अधिकार का दिला आहे ? हे लोकशाही विरोधी आणि घटना विरोधी आहे. शेतकरी आंदोलन देशविरोधी आहे, असा प्रचार सत्ताधाऱ्यानी करणे चुकीची गोष्ट होती, असेही निखिल वागळे यांनी सांगितले.

राजकीय, सामाजिक अभिसरणाचे काम निवडणुकीतून झाले पाहिजे.महाराष्ट्रात दलित, मुस्लीम, आदिवासी साठी महाविकास आघाडीने योगदान दिले पाहिजे.या आघाडीला महाराष्ट्रात अनुकूल वातावरण आहे. लोकशाहीत मॉब लिंचिंग होता कामा नये,अल्पसंख्य लोकशाहीत सुरक्षित राहिले पाहिजेत. प्रसाद असो किंवा अन्य कारणाने तेढ निर्माण होता कामा नये. गेले १० महिने महाराष्ट्रात दंगल पेटविण्याचे प्रयत्न चालू आहेत. राज्याचे गृहमंत्री दंगलीला प्रोत्साहन

देणारी भाषा वापरतात.ते गृहमंत्री पदावर राहण्याच्या योग्यतेचे नाहीत. पुण्यात कोयता गँग वाढते आहे, बलात्कार वाढत आहे.ते या गृहमंत्र्यांना रोखता येत नाही, असाही आरोप वागळे यांनी केला.भीमा कोरेगाव सारखी कट कारस्थाने पुन्हा होता कामा नये, असे त्यांनी सांगितले.

डॉ. कुमार सप्तर्षी यांनी अध्यक्षिय समारोप केला. ते म्हणाले, ‘लोकशाहीचे बीज टिकवून ठेवले पाहिजे. त्यासाठी संघर्ष केला पाहिजे. फॅसिझम पुढे जाता कामा नये.उत्सवातून हल्ली व्याख्याने आयोजित केली जात नाहीत.ते बंद होऊन विचार मारले जात आहेत, आणि वाद्यांचा आवाज मोठा केला जात आहेत.विचारांची परंपरा गांधी सप्ताहच्या निमित्ताने पुढे सुरु राहत आहे, ही आनंदाची गोष्ट आहे’.

Latest News