राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती (महाराष्ट्र प्रांत) आयोजित, बाराशे धावपटूंनी दिला ‘रन फॉर किडनी’चा संदेश…

‘सेवा भवन दौड़’
आशुतोष पात्राने जिंकली

पुणे -(ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)
‘सेवा भवन’ या पुण्यातील रुग्णसेवा प्रकल्पातर्फे रविवारी आयोजित ‘सेवा भवन दौड़’मध्ये उत्साहाने सहभागी होत बाराशे धावपटूंनी ‘रन फॉर किडनी हेल्थ’ हा संदेश दिला.‘सेवा भवन दौड़’च्या दहा किलोमीटर गटात आशुतोष पात्रा विजेता ठरला. युवकांबरोबरच ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग हे या उपक्रमाचे वैशिष्ट्य ठरले.

‘सेवा भवन दौड़’मधील दहा किलोमीटर गटाच्या शर्यतीचा प्रारंभ रविवारी सकाळी सव्वासहा वाजता महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतून करण्यात आला. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील,खासदार प्रा डॉ मेधा कुलकर्णी, लेखक, दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर, ‘गिरिप्रेमी’चे उमेश झिरपे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर,पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे कार्यवाह डॉ प्रवीण दबडघाव, पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर, ‘सेवा भारती’चे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघटनमंत्री श्रीपाद दाबक, ‘आयर्न मॅन’ निखिलेश पंत यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘सेवा भवन दौड़’ हा उपक्रम झाला.

ही शर्यत आशुतोष पात्रा याने जिंकली.त्याने ही शर्यत ४० मिनिटे ४९ सेकंद या वेळेत पूर्ण केली. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतून सकाळी पावणेसात वाजता पाच किलोमीटरच्या शर्यतीचा प्रारंभ करण्यात आला. या शिवाय ‘चॅरिटी रन’ हा उपक्रमही आयोजित करण्यात आला होता. ‘सेवा भवन दौड़’ या उपक्रमापासून ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती’च्या आरोग्यविषयक जनजागृती मोहिमेचाही प्रारंभ करण्यात आल्याचे समितीचे कार्यवाह प्रमोद गोऱ्हे यांनी सांगितले. ‘सेवा भवन’ प्रकल्प समितीच्या अध्यक्षा डॉ स्वाती बेलसरे, कार्यवाह पलाश देवळणकर, सहकार्यवाह उमा जोशी,मुख्य कार्यकारी अधिकारी संदेश उभे यांनी संयोजन आणि सारंग भिडे यांनी सूत्रसंचालन केले.

Latest News