नवकल्पना आणि कौशल्यांचा उपयोग समाज हितासाठी करावा – अस्मिता एम. पीसीयू मध्ये “टेक्निऑन २०२५” उपक्रम


नवकल्पना आणि कौशल्यांचा उपयोग समाज हितासाठी करावा – अस्मिता एम. पीसीयू मध्ये “टेक्निऑन २०२५” उपक्रम
पिंपरी, पुणे (दि.५ एप्रिल २०२५) संशोधन व तंत्रज्ञानाचा वेगाने होणारा विकास, विविध उद्योगांवरील त्याचा परिणाम, शासन व उद्योजकांचे त्याबाबत धोरण हे सर्व आत्मसात करून विद्यार्थ्यांनी आपल्या नवकल्पनांना व्यवहारिक जोड देऊन आपल्या कौशल्यांचा उपयोग समाजहितासाठी करावा असे मार्गदर्शन अस्मिता एम. यांनी केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) साते, वडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयु) येथे “टेक्निऑन २०२५” या उपक्रमाचे उद्घाटन प्रसंगी अस्मिता एम. बोलत होते.
या टेक्निऑन मध्ये ९६६ विद्यार्थ्यांनी विविध अभियांत्रिकी शाखांतून सहभागी होऊन १८८ प्रोजेक्ट्स, पोस्टर्स आणि मॉडेल्स चे सादरीकरण केले. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स, सस्टेनेबिलिटी आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटसारख्या विविध क्षेत्रांचा समावेश असलेल्या प्रकल्पांचे सादरीकरण केले.
यावेळी पीसीयूच्या कुलगुरू डॉ. मणिमाला पुरी, प्र – कुलगुरू डॉ. सुदीप थेपडे, इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग दुबई चे प्रा. डॉ. अमोल गोरे, एसओइएनटी विभागप्रमुख डॉ. रामदास बिरादार आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. अमोल गोरे यांनी शैक्षणिक व औद्योगिक अनुभवातून इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगमधील प्रक्रियांचे ऑप्टिमायझेशन, समस्यांचे निराकरण करण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व जागतिक अभियांत्रिकीतील बदल समजून घेण्यास सांगितले. विद्यार्थ्यांनी भौगोलिक व तांत्रिक सीमारेषा ओलांडून आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करून आपले करिअर घडवावे असे सांगितले
. पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मणिमाला पुरी यांनी सांगितले की, टेक्निऑन मधील उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपली प्रतिभा आणि संशोधन प्रख्यात अशा प्राध्यापक व उद्योग तज्ज्ञांसमोर मांडण्याची संधी मिळते.
विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या प्रगतीमध्ये आपले योगदान देण्यासाठी हे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. “टेक्निऑन २०२५” हे आमच्या विद्यार्थ्यांच्या प्रतिभेचे आणि सर्जनशीलतेचे जिवंत उदाहरण आहे, असे डॉ. रामदास बिरादार यांनी सांगितले.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी सहभागी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.____