स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यांमध्ये घेण्याचा राज्य निवडणूक आयोगाचा विचार

पुणे(ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)

महाराष्ट्रामध्ये प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या ६७६ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या मर्यादित उपलब्धतेमुळे या निवडणुका एकाच वेळी न होता, तीन टप्प्यांमध्ये घेण्याचा विचार राज्य निवडणूक आयोग करत आहे.

महानगरपालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुका डिसेंबर महिन्यात पार पडू शकतात.या निवडणुकांच्या तयारीला आता वेग आला आहे. राज्य निवडणूक आयोगाने ११ जुलै रोजी मान्यताप्राप्त राजकीय पक्षांसोबत बैठक बोलावंली आहे.

राज्यातील २९ महानगरपालिका, ३२ जिल्हा परिषदा, ३४९ पंचायत समित्या आणि इतर मिळून एकूण ६७६ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत.

या सर्व निवडणुका एकाच वेळी घेण्यासाठी आयोगाला सुमारे साडेसहा लाख ईव्हीएमची आवश्यकता आहे. मात्र, अपुऱ्या ईव्हीएम संख्येमुळे आयोगासमोर एकाच टप्प्यात मतदान घेणे हे एक मोठे आव्हान आहे.यावर तोडगा म्हणून, आयोगाने निवडणुका तीन टप्प्यांत विभागण्याची योजना आखली आहे.

या संभाव्य वेळापत्रकानुसार, पहिल्या टप्प्यात ऑक्टोबर महिन्यात पंचायत समित्या आणि नगरपंचायतींच्या निवडणुका होऊ शकतात. त्यानंतर, नोव्हेंबर महिन्यात जिल्हा परिषदांसाठी मतदान घेतले जाईल, आणि शेवटच्या व सर्वात मोठ्या टप्प्यात, डिसेंबर महिन्यात सर्व महानगरपालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुका पार पडतील.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नुकतीच या संदर्भात एक आढावा बैठक घेतली. सर्वोच्च न्यायालयानेही प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा तयार करून निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत, त्यामुळे आता लवकरच निवडणुकांचा मार्ग मोकळा होण्याची चिन्हे आहेत.

Latest News