१२ डिसेंबरला ऍड बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर शहरात; ‘एक संधी वंचितला’ सभेत करणार गर्जना– शहराध्यक्ष नितीन गवळी

Backup_of_ps logo rgb

पिंपरी चिंचवड (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) (प्रतिनिधी) दि.१० डिसेंबर २०२५ – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीतर्फे आयोजित ‘एक संधी वंचितला’ ही भव्य निर्धार सभा शहरात रंगणार आहे. सुर्यपुत्र भय्यासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त होणारी ही सभा राजकीय वातावरण तापवणारी ठरणार असून या सभेला वंचित चे सर्वेसर्वा ऍड बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार आहेत. सभा शुक्रवार दिनांक १२ डिसेंबर २०२५ रोजी पिंपरी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या (भीमसृष्टी)मागील मैदानात होणार आहे.या सभेमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवडणुकीचे बिगुल फुंकल्या जाणार असल्याचे स्पष्ट संकेत शहराध्यक्ष नितीन गवळी यांनी दिले.पिंपरीतील हॉटेल नमस्कार येथे (दि.१०) पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पत्रकार परिषदेला राज्य उपाध्यक्ष अनिल जाधव, सर्वजीत बनसोडे, शहर कार्याध्यक्ष राजेंद्र साळवे, शहर उपाध्यक्ष संतोष जोगदंड,महिला शहराध्यक्षा शारदा बनसोडे, युवक शहराध्यक्ष विनोद गायकवाड, महासचिव जितेंद्र मोटे, सचिन ओव्हाळ, सुजाता निकाळजे, मंदाकिनी गायकवाड, सुनील जावळे इत्यादी उपस्थीत होते.

या सभेत नेत्या अंजलीताई आंबेडकर, प्रदेश उपाध्यक्ष डॉ अनिल अण्णा जाधव, ऍड सर्वजीत बनसोडे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शहराध्यक्ष नितीन गवळी भूषवणार आहेत.वंचित बहुजन आघाडी, युवा आघाडी, महिला आघाडी, माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन, सम्यक विद्यार्थी आंदोलन, भारतीय बौध्द महासभा व समता सैनिक दल पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) यांच्या वतीने सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी बोलताना नितीन गवळी म्हणाले की, सभेच्या सुरवातीला भैय्यासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात येईल.पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीस काहीच महिने बाकी असताना शहरातील राजकीय वातावरण जोरदार तापले आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने ‘एक संधी वंचितला’ ही शक्तिप्रदर्शन सभा आयोजित केली असून, या सभेतून पक्ष शहरातील निवडणूक रणनीतीचा पहिला इशारा देणार आहे. सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या ११३ व्या जयंतीनिमित्त आयोजित या सभेचे औचित्य साधत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख मार्गदर्शक अॅड बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर हे कार्यकर्त्यांना दिशा देणार आहेत.त्यांच्या भाषणातून आगामी निवडणुकीवर मोठी घोषणा अपेक्षित आहे.शहरातील वाढती वाहतूक कोंडी, पाणी समस्या, अनियंत्रित विकास, कामगारांचे प्रलंबित प्रश्न, तसेच विस्थापितांच्या मागण्या या सर्व मुद्द्यांवर वंचित बहुजन आघाडीची ठोस भूमिका सभेतून जाहीर होईल.शहरातील वंचित बहुजन आघाडी, युवा आघाडी, किसान आघाडी, महिला आघाडी आणि सर्व घटक संघटनांची तयारी पूर्ण झाली असून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहणार आहेत.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीत वंचित समाजाच्या हक्कांसाठी आता निर्णायक लढा उभारला जाणार आहे. ‘एक संधी वंचितला’ या सभेतून पक्ष आपली दिशा, ध्येय आणि ठोस भूमिका जनते समोर मांडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शहरातील पाणीप्रश्न, वाहतूक कोंडी, कामगारांचे प्रश्न, तसेच विकासकामांमधील असमतोल यावर पक्ष परखड भूमिका घेणार असून प्रकाश आंबेडकरांचे भाषण नागरिकांना नव्या राजकीय पर्यायाची हमी देईल, असा विश्वास वंचित चे राज्यउपाध्यक्ष अनिल जाधव यांनी व्यक्त केला.

Latest News