‘एक संधी वंचितला’ निर्धार सभेत बाळासाहेब आंबेडकरांचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात; मतदान, घरकुल, SRA, देशाची दिशा यावर परखड भूमिका

पिंपरी ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- (प्रतिनिधी) दि.१३ डिसेंबर २०२५:– शहरात आयोजित ‘एक संधी वंचितला’ या भव्य निर्धार सभेत वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड. बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांनी सत्ताधारी व्यवस्थेवर जोरदार टीका करत नागरिकांना संविधानिक हक्कांसाठी जागृत राहण्याचे आवाहन केले. हजारो नागरिकांच्या उपस्थितीत झालेल्या या सभेत त्यांनी मतदान प्रक्रिया, झोपडपट्टी पुनर्वसन, SRA योजना, देशाची राजकीय दिशा आणि संविधानाच्या रक्षणावर परखड भूमिका मांडली.बाळासाहेब आंबेडकर म्हणाले की, ज्याला मतदानाचा अधिकारच वापरता आला नाही, त्याचे मतदान चोरी झाले असे म्हणता येईल. पण मतदानाचा हक्क बजावूनही मत चोरी झाल्याची ओरड केली जाते, ही दिशाभूल आहे. प्रत्यक्षात बूथवर बसलेले अधिकारीच १०० ते १५० मते सत्ताधारी पक्षाला टाकतात. ही मतांची चोरी नाही, तर अधिकची मते सत्ताधाऱ्यांना देण्याची पद्धतशीर प्रक्रिया राबवली जात आहे. ते डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक (भीमसृष्टी) मागील मैदानावर झालेल्या एक संधी वंचितला सभेत बोलत होते. यावेळी सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांना ११३ व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.सुरुवातीला गायक मेघानंद जाधव यांच्या भीमगीताचा कार्यक्रम झाला.तसेच समता सैनिक दलाकडून ॲड बाळासाहेब आंबेडकर यांना सलामी देण्यात आली.
आंबेडकर पुढे म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहरात झोपडपट्टीत राहणाऱ्या मुस्लिम समाजाला टार्गेट केले जात असून, शहरात सुमारे २० हजार मुस्लिमांच्या घरांवर बुलडोझर फिरवण्यात आला आहे.आता झोपडपट्टी धारकाला संधी आली आहे. जो झोपडपट्टी धारक निवडणुकीला उभा राहणार असेल, त्याला वंचित बहुजन आघाडीचे तिकीट दिल्याशिवाय राहणार नाही. आपले घर आपणच बांधायचे ठरवले पाहिजे आणि झोपडपट्टी धारकांचा प्रतिनिधी सभागृहात पाठवला पाहिजे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.घरकुल आणि SRA योजनांवर बोलताना त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली. जोपर्यंत कायमस्वरूपी घर मिळत नाही, तोपर्यंत किमान १५ हजार रुपये घरभाडे मिळाले पाहिजे. खासगी बिल्डर ज्या ठिकाणी SRA योजना राबवेल, तेथे १५ हजार रुपये भाडे देणार असल्याचे लेखी देत नाही, तोपर्यंत त्याला कोणतीही परवानगी मिळू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
देशाच्या परराष्ट्र आणि अंतर्गत राजकारणावर भाष्य करताना बाळासाहेब आंबेडकर म्हणाले, देशाची राजकीय परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. पंतप्रधान मोदी चीन आपला मित्र असल्याचे सांगतात, तर लष्करप्रमुख चीन आपला शत्रू असल्याचे स्पष्ट करतात. विश्वास कोणावर ठेवायचा? मी लष्करप्रमुखांवर विश्वास ठेवतो. गेल्या पंधरा वर्षांपासून धर्माच्या नावावर राजकारण सुरू असल्याने आज भारतासोबत एकही खरा मित्र उरलेला नाही, असा घणाघाती आरोप त्यांनी केला.
प्रबुद्ध भारत टीमकडून विशेष मालिकेची घोषणा
या सभेत प्रबुद्ध भारत टीमच्या वतीने वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या संसदेतील १०० पेक्षा अधिक ऐतिहासिक, दिशादर्शक आणि मुद्देसूद भाषणांवर आधारित विशेष मालिकेची घोषणा करण्यात आली. या मालिकेचा प्रभावी टिझर सभास्थळी प्रदर्शित करण्यात आला. टिझरला उपस्थित नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. लवकरच प्रबुद्ध भारतच्या माध्यमातून ही मालिका प्रसारित होणार असून, बहुजन समाजाच्या प्रश्नांवर संसदेत मांडलेले बाळासाहेब आंबेडकरांचे विचार जनतेपर्यंत पोहोचवण्याचा हा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरणार आहे.
यावेळी बोलताना राज्य उपाध्यक्ष अनिल जाधव म्हणाले की,जेव्हा जेव्हा संकट येते, अन्याय आणि अत्याचार होतो, तेव्हा फक्त बाळासाहेब आंबेडकर लढण्यासाठी पुढे येतात. संविधानाचा सन्मान आणि रक्षण करण्याचे काम केवळ वंचित बहुजन आघाडी करत आहे. वंचित, शोषित समाजाला संविधानिक विचारांच्या आधारे न्याय मिळवून देणारे आणि संधी देणारे एकमेव नेते बाळासाहेब आंबेडकर आहेत.
फुले, शाहू, आंबेडकर यांच्यावर बोलणारे अनेक आहेत; पण त्यांचे विचार प्रत्यक्ष कृतीत उतरवणारे एकमेव नेते बाळासाहेब आंबेडकर आहेत. SRA कार्यालयावर मोर्चा काढून जनतेला हक्काचे घर मिळवून देण्यासाठी सर्व मागण्या मान्य करून घेणारे नेतृत्व त्यांनीच दिले आहे असे मत राज्य उपाध्यक्ष सर्वजित बनसोडे यांनी व्यक्त केले.
शहराध्यक्ष नितीन गवळी यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करत सांगितले की,भाजपाने सत्तेत आल्यापासून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला कंगाल केले आहे. आज देशात खरी विरोधी पक्षाची भूमिका फक्त वंचित बहुजन आघाडी बजावत आहे. जनत…
