भटक्या विमुक्तांना व्यवस्थेने भिकारी बनविले : पद्मश्री माने

अनुसूचित जमाती आरक्षणाची मागणी १६ ऑक्टोबरला क्रांती मोर्चा
पुणे,(ऑनलाईन न्यूज परिवर्तनाचा सामना-)
ब्रिटिशांविरुद्ध आम्ही भूमिपुत्र म्हणून लढलो. त्यांनी आम्हाला जन्मजात गुन्हेगार ठरवले. ८० वर्षे आम्ही ओपन जेलमध्ये काढली. आम्ही खरे स्वातंत्र्य सैनिक, मूलनिवासी, आदिवासी आहोत. देशातल्या आदिवासींचे बंड मोडण्यासाठी इंग्रज सरकारने आदिवासी टोळ्यांना पकडून सक्तीने दुसऱ्या राज्यात स्थलांतरित केले, त्यात आमची काय चूक. इंग्रजांनी केलेल्या चुकीची शिक्षा आजही आम्ही भोगतो आहोत. भटक्या विमुक्तांचा इतिहास लढणाऱ्यांचा आहे; परंतु येथील व्यवस्थेने आम्हाला भिकारी बनविले आहे, असे परखड मत भटक्या विमुक्त जमाती संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष पद्मश्री लक्ष्मण माने यांनी पुणे येथील पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
या वेळी संघटनेचे ज्येष्ठ नेते शिवलाल जाधव, शिदू शिंदे, सरचिटणीस नारायण जावळीकर ॲडवोकेट दिलीप कुऱ्हाडे, भरत विटकर, मच्छिंद्र चव्हाण, रजनी पाचंगे, सुप्रिया सोळांकुरे, कलावती भाटी, उर्मिला पवार, ॲडवोकेट सुरेखा माने, दिलीप गुंजाळ, अंबरनाथ इंगोले, दिलीप परदेशी, मोहन शिंदे.
भटक्या विमुक्त जमाती संघटना, भटके विमुक्त आदिवासी फेडरेशन यांच्यावतीने माने यांच्या नेतृत्वाखाली गुरुवार, १६ ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता शनिवार वाडा (पुणे) येथून क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर पुणे दौऱ्यावर आले असता ते बोलत होते.
पुढे बोलताना माने यांनी, हैदराबाद गॅझेटिअरमधील नोंदींच्या आधारावर मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. हैदराबाद, सातारा आणि बॉम्बे गॅझेटमध्ये भटक्या विमुक्त समाजाचा उल्लेख आदिवासी म्हणून आहे. भटक्या विमुक्त जाती-जमाती या ओबीसी नाहीत तर मूळच्या आदिवासी आहेत. त्यामुळे त्यांचा समावेश अनुसूचित जमातींमध्ये करावा. आमची मागणी न्याय्य आहे. व्यवस्थेने आम्हाला ओबीसींमध्ये समाविष्ट करून हक्काचे सतरा आमदार आणि तीन खासदार जागा चोरल्या आहेत. गावगाड्याच्या बाहेर, रानावनात राहणारे असताना आमचा समावेश ओबीसींमध्ये कसा? आम्ही आदिवासी असून आम्हाला ओबीसीमधून बाहेर काढले पाहिजे, असे स्पष्ट केले.
आम्ही आरक्षणात समाविष्ट असून आताच्या यादीमध्ये असलेल्या आदिवासींचे आम्हाला काही नको. आमच्या ज्या साडेपाच टक्के जागा आहेत, त्या आम्हाला मिळाल्या पाहिजेत. त्यासाठी आम्ही लढत आहोत. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक हक्कांसाठी सविनय मार्गाने आम्ही लढणार आणि जिंकणार आहोत. आम्ही आदिवासी आहोत आणि आदिवासींच्या सवलती घेणार, असेही माने यांनी म्हटले आहे. पुणे येथे आयोजित क्रांती मोर्चात आमच्या मागण्या मांडून शासनाचे लक्ष वेधणार आहोत. याप्रसंगी भटक्या विमुक्त जमाती संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते महिला आघाडीच्या कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
