मशाली पेटवून रस्त्यावर येणे हा बेजबाबदारपणाच :उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाचा अंधकार दूर करण्यासाठी पाच एप्रिलला रविवारी रात्री नऊ वाजता घराच्या बाहेर येऊन दिवा, मेणबत्ती अथवा टॉर्चचा प्रकाश करण्याचं आवाहन केलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या आवाहनला देशभरातून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. मात्र, काही अतिउत्साही लोकांनी मशाली पेटवून, फटाके फोडून रस्त्यावर गर्दी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या लोकांचे कान टोचले आहेत. देशाच्या पंतप्रधानांनी दारात, खिडकीत दिवे लावायला सांगितलं असतानाही लोकांनी रस्त्यावर येत अशी कृत्ये करणे म्हणजे बेजबाबदारपणाचा कळस असल्याचं ट्विट अजित पवार यांनी केलं आहे. कोरोना संकटाशी सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला घराबाहेर येऊन दिवे लावण्याचं आवाहन केलं होतं. यावेळी सोशल डिस्टन्स पाळण्याचंही आवाहन मोदी यांनी केलं होतं. मात्र, काही अतिउत्साही लोकांनी रस्त्यावर येत फटाके फोडले, तर काहींनी मशाल हाती घेत लहान मुलांसह रस्त्यावर फेरी मारल्याचेही व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टीका केली आहे. “देशाच्या पंतप्रधानांनी दारात, खिडकीत दिवे लावायला सांगितलं असतानाही मशाली पेटवून लहान मुलं, महिलांना सोबत घेऊन झुंडीनं रस्त्यावर उतरणं, फटाके वाजवून आगीला कारणीभूत ठरणं, हा बेजबाबदारपणाचा कळस आहे. आत्ताच्या परिस्थितीचं गांभीर्य काही जणांच्या लक्षात येत नाही, हे दुर्दैव आहे.”, असं ट्विट अजित पवार यांनी केलं आहे.

Latest News