छत्तीसगडमधील माजी जिल्हाधिकारी जनक प्रसाद पाठक यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल

रायपूर: छत्तीसगडमधील जांजगीर चांपा जिल्ह्यात भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्याविरूद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जांजगीर-चांपा जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, ३३ वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून माजी जिल्हाधिकारी जनक प्रसाद पाठक यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाठक यांच्याकडे सध्या संचालक भूमी अभिलेखपद आहे.

पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, महिलेने जांजगीर-चांपा जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक पारुल माथूर यांच्यासमोर हजर राहून लेखी अर्ज सादर केला होता. यावेळी महिलेने असा आरोप केला आहे की, गेल्या महिन्याच्या १५ तारखेला जनक प्रसाद पाठक यांनी महिलेला अशी धमकी दिली की, तिच्या पतीला कामावरुन काढून टाकेन आणि त्यानंतर पाठक यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तिच्यावर बलात्कार केला. दरम्यान, या महिलेचा पती सरकारी विभागात आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, महिलेने असाही आरोप केला आहे की, पाठक यांनी तिच्या मोबाइलवर अश्लील मेसेज देखील पाठविले आहेत. यावेळी महिलेने या मेसेजचा स्क्रीनशॉट देखील पोलिसांना दाखविला आहे. दरम्यान, महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी पाठकविरूद्ध आज गुन्हा दाखल केला आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

पाठक यांची बदली २६ मे रोजी जिल्हाधिकारी जांजगीर चंपा या पदावरुन संचालक भू-अभिलेख पदावर करण्यात आली होती. दरम्यान, अद्याप याप्रकरणी पाठक यांची बाजू समजू शकलेली नाही. अद्याप ते माध्यमांसमोर आलेले नाहीत.

दुसरीकडे याप्रकरणी आता या बड्या अधिकाऱ्यावर छत्तीसगड प्रशासन नेमकी काय कारवाई करणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच छत्तीसगढच्या महासमुंद जिल्ह्यात विधवा महिला कर्मचाऱ्याला धमकावून चार लोकांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली होती. धक्कादायक म्हणजे, एकदा नव्हे तर वारंवार या चारही आरोपींनी तिला आपली शिकार बनवली. चार आरोपींमध्ये तीन सरकारी कर्मचारी आहेत. यात एका पोलीस कर्मचाऱ्याचाही समावेश होता. पोलिसांनी तीन आरोपींना अटक केलीय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पतीच्या निधनानंतर कलेक्ट्रेटच्या एका विभागात महिला आपल्या पतीच्या जागी नोकरीला लागली होती. यावेळी चार नराधमांनी तिच्यावर वारंवार सामूहिक बलात्कार केला.

Latest News