‘मिशन बिगिन’ अगेन’ला सुरुवात! मुंबईकरांना दिलासा

मुंबई – कोरोनावर मात करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या ‘मिशन बिगीन अगेन’ धोरणाला आजपासून सुरुवात झाली आहे. या मिशनचा पहिला आणि दुसरा टप्पा आजपासून सुरू होत आहे. त्यानुसार राज्यातील प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर सर्व भागातील दुकाने आता सशर्त उघडणार आहेत. तसेच अनेक ठिकाणी काही प्रमाणात शिथिलता येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे मागच्या अडीच महिन्यांपासून कठोर निर्बंध असलेली मुंबई आजपासून अंशतः सुरु होणार आहेत. परंतु बाजारपेठा, दुकाने सुरु होणार असली तरी तिथे आता पुर्वीसारखी गर्दी करता येणार नाही. दरम्यान, ‘मिशन बिगिन अगेन’चा तिसरा टप्पा ८ जूनपासून सुरू होणार आहे. पहिला टप्पा या टप्प्यात सकाळी 5 ते संध्याकाळी 7 या वेळेत खाजगी किंवा सार्वजनिक मैदाने, समुद्र किनारे, बाग इत्यादी ठिकाणी व्यायामाला परवानगी असणार आहे. मात्र इनडोर स्टेडियममध्ये परवानगी नसेल. व्यायामासाठी केवळ जवळच्या ठिकाणी जाण्याची सूचना देण्यात आली असून लहान मुलांसोबत पालकांना थांबणे अनिवार्य असेल. त्याचबरोबर सामूहिक अॅक्टिविटीजना परवानगी देण्यात आलेली नाही. आजपासून सर्व सरकारी कार्यालयात गरजेनुसार किमान 15 टक्के कर्मचारी वर्ग किंवा किमान 15 कर्मचारी (जे अधिक असेल ते) काम करतील. तसेच प्लंबर, इलेक्ट्रिशियन, पेस्ट कंट्रोल अशा तंत्रज्ञांनी सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करुन काम करावे, गॅरेजची वेळ घेऊन वाहन दुरुस्तीची कामे करावीत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. दुसरा टप्पा या टप्प्यात मॉल आणि मार्केट कॉम्प्लेक्सवगळता सर्व बाजार, दुकाने सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेत एक दिवसाआड उघडतील. तसेच टॅक्सी, कॅब, रिक्षा, चारचाकी केवळ आवश्यक प्रवासाकरिता सुरू होणार असून यामध्ये केवळ चालक आणि २ प्रवासी असतील. तर दुचाकीवरून केवळ चालक प्रवास करू शकेल. तसेच दुकानांमध्ये ट्रायल रुम बंद राहतील. कपडे परत घेणे किंवा बदलून देणे, याला परवानगी नाही. तर सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची जबाबदारी दुकानदारांची असून त्यांनी होम डिलिव्हरी, टोकन सिस्टम, मार्किंग अशी पद्धत अवलंबावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

Latest News