पुण्यातील मंचरमध्ये ‘छत्री पॅटर्न’


पुणे : देशाप्रमाणे राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. यासाठी सरकारकडून विविध उपाययोजनादेखील अंमलात आणल्या जात आहे. तसेच शासनाकडून सतत सोशल डिस्टन्स पाळा असे आवाहन केले जात आहे. पुणे जिल्ह्यातील मंचर गावामध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी केरळच्या धर्तीवर अनोखा छत्री पटर्न राबवण्यात आला.
हा छत्री पॅटर्न राबवण्यासाठी मंचरमध्ये ग्रामस्थांच्या घरी जाऊन आवाहन केलं जातं आहे. मंचरमधील हा छत्री पॅटर्न सध्या चांगला व्हायरल झाला आहे. बरं या पॅटर्नमुळे आपोआप सोशल डिस्टन्सिंग ही राखलं जातं आहे.
पुणे जिल्ह्यातील मंचरमधील महिलांनी छत्री पॅटर्नचं चॅलेंज स्विकारलं आहे. इतकंच नव्हे तर अनेक महिला रस्त्यावर उतरुन, घरोघरी जाऊन छत्री वापरण्याचं आवाहन करत आहेत. अनेकांचे सोशल मीडियावरील फोटो आणि रस्त्या-रस्त्यावरील दृश्य पाहून हे छत्रीचं खूळ का चढलंय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या मंडळींनी सोशल डिस्टंसिंगसाठी ही शक्कल लढवली आहे.
लॉकडाऊनमधून शिथिलता मिळाली अन मंचर गावात सर्व ठिकाणी गर्दी वाढू लागली. मग सोशल डिस्टंसिंग राखण्यासाठी गावचे सरपंच दत्ता गांजाळेंनी केरळच्या धर्तीवर ही संकल्पना राबवायचं ठरवलं. पण उन्हात छत्री घेऊन फिरायचं म्हटलं की अनेकांनी नाकं मुरडली. मग स्वतः सरपंचानीच गावात छत्री घेऊन प्रबोधन सुरु केलं.
मंचर गावातील सरपंचांची ही संकल्पना महिलांना खूपच आवडली. मग काय महिलांनी ही संकल्पना डोक्यावर घेतली. अन् घरोघरी जाऊन छत्री पॅटर्न पोहचवण्यास सुरुवात झाली. त्यात सेल्फी विथ अम्ब्रेलाची भर पडली. अन अबाल-वृध्दांच्या स्टेट्सवर छत्रीसह फोटो झळकू लागले. महिलांनीच हा उपक्रम हाती घेतल्याने पुरुषांना देखील यात सहभाग घेण्याविना पर्यायच उरला नव्हता.
छत्री पॅटर्न नेमका काय?
- केरळमधील एका ठाणीरमुक्कोम या छोट्याशा गावात हा छत्री पॅटर्न राबवला जात आहे.
- छत्रीचा परिघ हा मोठा असतो.
- त्यामुळे जर दोन व्यक्ती छत्री घेऊन समोरासमोर आल्या तरी छत्रीमुळे तीन फुटापर्यंत सोशल डिस्टन्सिंग राखलं जातं.
- कोरोनामुळे गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
- त्यामुळे हा छत्री पॅटर्न चांगलाच फायदेशीर ठरला.
- विशेष म्हणजे यामुळे लोकांना लॉकडाऊन शिथीलतेचा फायदाही घेता येत आहे.
- तसेच गर्दी टाळणे, सोशल डिस्टंसिंगही पाळले जात आहे.